कार्ला : मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ग्रामसेवक मिळाला आहे. भाजे गावच्या ग्रामपंचायत अधिकारी मोहिनी दौंडकर ह्या रजेवर गेल्याने त्यांच्या जागी मळवली गावच्या ग्रामपंचायत अधिकारी पुनम सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु सुर्यवंशी यांनी अतिरिक्त पदभार न स्वीकारल्याने दोन महिन्यांपासून ग्रामसेवकाविना भाजे ग्रामपंचायतीत कामांचा खोळंबा झाला होता. अखेर दैनिक प्रभातने १३ एप्रिल रोजी या समस्येला वाचा फोडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. वरीष्ठांच्या आदेशानंतर मंगळवारी (दि. १५) पुनम सुर्यवंशी यांनी भाजे ग्रामपंचायत कार्यालयात येऊन आपला पदभार स्वीकारला आहे. भाजेच्या ग्रामपंचायत अधिकारी मोहिनी दौंडकर या दिनांक १० फेब्रुवारी २०२५ पासून वैद्यकीय कारणास्तव रजेवर आहेत. त्यामुळे भाजे गावचा अतिरिक्त कार्यभार सुरूवातीला वेहेरगावचे ग्रामपंचायत अधिकारी गणेश आंबेकर यांच्याकडे देण्यात आलेला, परंतु नंतर त्यात बदल करून मळवली गावच्या ग्रामपंचायत अधिकारी पुनम सुर्यवंशी यांच्याकडे भाजेचा अतिरिक्त पदभार देण्याचा आदेश गटविकास अधिकारी के.के. प्रधान यांनी २५ फेब्रुवारी रोजी दिला होता. सुर्यवंशी यांनी मळवली गावचा पदभार सांभाळत असताना भाजे गावचा पदभार पाहायचा होता. परंतु पुनम सुर्यवंशी यांनी भाजे ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायत अधिकारी म्हणून पदभार न स्वीकारल्याने दोन महिन्यांपासून ग्रामपंचायतीची कामे खोळंबली होती. अखेर दै. प्रभातमध्ये बातमी प्रसिद्ध होताच दोन दिवसात सुर्यवंशी यांनी भाजे गवाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला आहे. ‘भाजे ग्रामपंचायतीला ग्रामसेवकाची प्रतीक्षा’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करीत दै. प्रभातने भाजे ग्रामस्थांच्या समस्येला वाचा फोडली होती. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनीही मंगळवारपर्यंत ग्रामसेवक न मिळाल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. अखेर ग्रामसेविका पूनम सूर्यवंशी यांनी मंगळवारी भाजेचा अतिरिक्त पदभार स्विकारला. याबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून दै. प्रभातचे आभार मानले आहेत. याप्रसंगी सरपंच प्रिया ओव्हाळ, उपसरपंच विकास वाल्हेकर, सदस्या सारिका पदमूले, कोमल केदारी, उज्वला काळे उपस्थित होत्या, त्यांनी ग्रामसेविका सूर्यवंशी यांचे स्वागत केले. १. भाजे ग्रामपंचायत एकदम छोटासा लावणे. २. सुर्यवंशी यांचे स्वागत करताना ३. दै. प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी.