Pimpri : दाखल्यांसाठी वाजवीपेक्षा जास्त शुल्क; तहसीलदार चव्हाण यांना निवेदन

खालापूर : खालापूर तहसील कार्यालयातील आपले सरकार सेवा सेतू केंद्राच्या माध्यमातून दिले जाणारे दाखले व विविध प्रकारच्या सेवांसाठी नियमापेक्षा अधिक शुल्क आकारले जात असून सामान्यांची लूट सुरु असल्याबाबत तहसीलदार अभय चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे. दाखल्यांसाठी वाजवीपेक्षा अधिक शुल्क घेतले जात असून असा भ्रष्टाचार करणाऱ्या सेतू केंद्र चालकांवर त्वरित कारवाई व्हावी, याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुरेश गावडे यांनी तहसीलदार चव्हाण यांस निवेदन दिले आहे.
आपले सरकार सेवा केंद्राची प्रत्येक महिन्यास तपासणी केली जाते. मात्र तहसीलदार कार्यालायाकडून तपासणी होत नाही, असे दिसून आले आहे. तपासणी होत असती तर संबंधित भ्रष्टाचार उघड झाला असता. परंतु सेतू केंद्र चालकाना पाठीशी घातले जात असल्याचे दिसत आहे, असे गावडे यांनी सांगितले.
सर्व प्रकरणाची शासकीय नियमानुसार योग्य ती चौकशी करून लवकरात लवकर तालुक्यातील नागरिकांना न्याय मिळावा. सोबतच सेतू केंद्र चालकांनी शासकीय सेवांचा दर फलक लावावेत, नागरिकांसाठी आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी, शुल्क निश्चित केलेली पावती देणे, दाखल्यांसाठी ठरवून दिलेले दर केंद्रावर प्रसिद्ध करावे, वेळेनुसार सेवा बजवावी, काही तक्रार असल्यास हेल्पलाईन क्रमांकावर उपलब्ध करून द्यावा आदी मागण्या निवेदनातून केल्या आहेत.





