Pimpri : चार लाखाची लाच घेताना मंडलाधिकारी जाळ्यात

पिंपरी : बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी चार लाखाची लाच स्वीकारताना मंडलाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. पुणे लासलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. ४) चिंचवड येथील मंडलाधिकारी कार्यालय येथे ही कारवाई केली.
सुरेंद्र साहेबराव जाधव (वय ५६) असे रंगेहात पकडलेल्या मंडलाधिकाऱ्याचे नाव आहे. वाल्हेकरवाडी येथील ५३ वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराने वाल्हेकरवाडी येथे सहा गुंठे जागा घेऊन बंगल्याचे बांधकाम केले होते.
या बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव यांनी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती चार लाख ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी चिंचवड मंडलाधिकारी कार्यालय येथे सापळा लावला.
मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव यांनी लाचेचे चार लाख रुपये स्वीकारले. लाचेची ही रक्कम जाधव यांनी पार्किंग मधील कारमध्ये ठेवत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. गाडीमधून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली.





