Pimpri : देहू नगरपंचायत हद्दीत गढूळ पाणीपुरवठा; नागरिकांची प्रशासनाकडे तक्रार

देहूगाव : देहू नगर पंचायत हद्दीत दोन दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवशी गढुळ व हिरवट रंगाच्या पाण्याचा पुरवठा झाल्याची तक्रार नागरिकांनी केली असून सध्या फैलावत असलेल्या गुइलेन बैरे सिंड्रोमच्या (जीबीएस) पार्श्वभूमीवर नगर पंचायत प्रशासनाने स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल, याची दक्षता घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुणे शहरासह आता पिंपरी-चिंचवड परिसरात देखील जीबीएस रुग्णसंख्या वाढत आहे. दुषित पाण्यातून हा आजार फैलावत असल्याने स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीपुरवठ्याची मागणी देहू ग्रामस्थ करीत आहेत.
पाणीपुरवठा करणाऱ्या भूमीगत जलवाहिन्या स्वच्छ करण्याचे काम सुरू होते. ते काम पूर्ण झाले असून शनिवारी झालेल्या पाणीपुरवठ्यातील पाण्याचे नमुने तपासून घेतले जातील. त्यानुसार पाण्याचे शुद्धीकरण वाढवून पाणीपुरवठा केला जाईल. तसेच ज्या भागात गढुळ पाणीपुरवठा झाला तिथे कुठे पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटली आहे का याची तपासणी सुरू आहे. देहू नगर पंचायत नागरिकांच्या आरोग्याबाबत सतर्क असून शुद्ध पाणीपुरवठा करण्यास बांधील असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे यांनी सांगितले.





