पिंपरी : चिंचवडगाव येथील महापालिकेच्या जिजाऊ पर्यटन केंद्राची दुरवस्था झाली असून खेळणी तुटली असून पथदिव्यांचे झाकणे गायब आहेत. स्वच्छतागृहाची नियमित साफसफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. महापालिका उद्यान विभागाने तातडीने याची दखल घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात. अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या वतीने ३ जानेवारी २०१७ रोजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते या पर्यटन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या पर्यटन केंद्रात फायबरचा वापर करुन विविध प्राण्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. तसेच ओपन जिमही उभारण्यात आली आहे. मात्र, सध्या या प्राण्यांची अवस्था खराब झाली असून अनेक प्राणी तुटले आहेत, त्यांचा रंगही पुसट झाला आहे. या उद्यानात लहान मुलांची मोठ्या संख्या असते. मात्र, दिव्यांचे झाकणे गायब झाली असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. फरशाही निखळल्या आहेत. खेळणी झाली धोकादायक या पर्यटन केंद्रात मुलांसाठी खेळणी असून अनेक खेळणी तुटलेली आहेत. त्यावर काही लहान मुले खेळत असतात, त्यामुळे मुलांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फिरणारे बदक तुटले असून घसरगुंडीला चिरा पडल्या आहेत. घसरगुडींच्या पायऱ्या, बाकडी मोडकळीस आलेले आहेत. कलाकार व्यासपीठाचे पाइप तुटले असून या व्यासपीठाला अवकळा आली आहे. महापालिका या पर्यटन केंद्रासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही, तसेच शजारीच श्रीमंत मोरया गोसावी मंदिर असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी या उद्यानात असते. तसेच खुली व्यायामशाळा असल्याने आबालवृद्ध मोठ्या संख्यने येत असतात. मात्र, महापालिका उद्यान विभागाने या उद्यानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या उद्यानात प्राण्यांच्या प्रतिकृती पाहण्यासाठी पालक त्यांच्या मुलांना घेऊन येतात. तसेच खेळणी तुटलेली असल्याने लहान मुलांचा हिरमोड होत आहे. विशेषः सुट्टीच्या दिवशी गर्दी असते. तसेच अनेक नागरिक दर्शनानंतर या उद्यानात फेरफटका मारत असतात. मात्र, आता उद्यानाची अवस्था दयनीय झाली आहे. महापालिकेने तातडीने या उद्यानाची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे. – दिपाली कांबळे, पर्यटक