मोरवाडी चौकातील पदपथ रुंदीकरणावर ठाम – चौकात गट्टू लावून रस्ता अरुंद वाहतूककोंडीने नागरिक हैराण पिंपरी – शहरातील प्रमुख चौकांपैकी एक असलेल्या अहिल्यादेवी होळकर चौकात (मोरवाडी चौक) गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पदपथ रुंदीकरणाचे काम प्रायोगिक तत्वावर सुरू झाल्याने चौकातील रस्ते अरुंद झाले असून, वाहतूक सुरळीत ठेवणे अवघड झाले आहे. तसेच महापालिकेच्या वतीने चौकामध्ये प्रायोगिक तत्वावर सिमेंटचे मोठमोठे गट्टू लावून वाहतूक नियंत्रणाचा अभ्यास केला जात आहे. यावर नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी टीकेची झोड उठवली आहे. असे असतानाही महापालिका मात्र पदपथ रुंद करण्यावर ठाम आहे. परिणामी वाहतूक नियंत्रणाबाहेर जात असून चौकामध्ये अभूतपूर्व कोंडी होत आहे. मोरवाडी न्यायालयाच्या बाजूने येणाऱ्या रस्त्यावर पदपथ रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या पूर्वी चौकातील प्रत्येक रस्त्यावरील पदपथांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता आधीच अरुंद झाला आहे. त्यातच आता या चौकात पदपथ रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. आधीच या चौकात मेट्रो स्टेशनमुळे सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांची मोठी गर्दी असते. मेट्रोने प्रवास करणारे अनेक नागरिक आपली दुचाकी आणि चारचाकी वाहने चौकात किंवा जवळपासच पार्क करतात. त्यामुळे रस्त्यावरील जागा आणखी कमी होते आणि वाहतूक कोंडी वाढते. यात भर म्हणून, चौकात असलेल्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या दुकानदारांकाडून ग्राहकांसाठी वाहन पार्किंगची व्यवस्था केली जात नाही. त्यामुळे अनेक नागरिक रस्त्यांच्या कडेला वाहने लावतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोरवाडी चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूने सायकल ट्रॅक उभारण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणचा रस्ता पूर्णपणे अरुंद झाला आहे. तसेच महापालिकेच्या इमारतीच्या बाजूनेही पदपथ दुरुस्ती करण्यात आली आहे. महापालिकेत येणाऱे अनेक नगारिक या पदपथांच्या बाजूलाच आपली चारचाकी वाहने उभी करतात. मोरवाडी चौकातून चिंचवडकडे जाणाऱ्या आणि चिंचवडवरून मोरवाडी चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावरही पदपथ रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे येथेही मोठ्या प्रमाणा रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. यावर टीका झाली असतानाही प्रशासन हे काम रेटण्याच्या मनस्थितीत आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. कार्यालय गाठताना नागरिकांची कसरत स्मार्ट सिटी योजनेचा उद्देश शहरातील पायाभूत सुविधा सुधारण्याचा असला तरी, महापालिकेने हे काम नियोजनशून्य पद्धतीने हाती घेतले आहे. पदपथ रुंदीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वी वाहतूक विभागाशी कोणताही समन्वय साधण्यात आला नाही का, असा सवाल नागरिक करत आहेत. चौकात आधीच जागा कमी आहे, त्यातच भर म्हणून चौकाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली रस्ते गिळंकृत केले आहेत. तर, पदपथ मोठे करण्यासाठी काम सुरू केल्याने मोठी कोंडी होत आहे. या कोंडीतून वाट काढत कार्यालय गाठताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अनेकांना ऑफिसच्या लेटमार्कचा भुर्दंड बसतो. कामाबाबत पुनर्विचार करण्याचे पोलिसांचे पत्र मोरवाडी चौकातील पदपथ रुंदीकरणाच्या कामाबाबत पुनर्विचार करावा, असे पत्र पिंपरी वाहतूक विभागाने महापालिकेले दिले आहे. त्यानंतरही महापालिकेने या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर सिमेंटचे मोठमोठे गट्टू लावून वाहतुकीवर काय परिणाम होत आहे, याचा अभ्यास सुरु केला आहे. येत्या काही दिवसांत पदपथ रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात करणार असल्याची माहितीही प्राप्त झाली आहे. पदपथ रुंदीकरणाबाबत सध्या ट्रायल सुरु आहे. बेशिस्त रिक्षाचालकांमुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. या भागाची पूर्णपणे पाहणी करण्यात आली आहे. मेट्रोने दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यांच्या आणि सर्वसामान्य पादचाऱ्यांच्या सोयीसाठी पदपथ रुंदीकरण करणे गरजेचे आहे. ट्रायलनंतर पदपथ किती व कसा रुंदीकरण करायचा याचा निर्णय घेण्यात येईल. – बापूसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, दळणवळण विभाग