पिंपरी : मकरसंक्रांतीला परिधान केल्या जाणार्या काळ्या वस्त्रांच्या प्र्रथेमुळे बाजारात काळ्या रंगाची साडी व तयार ड्रेसला मागणी वाढल्याचे चित्र होते. तर महिलांकडून असणारी मागणी लक्षात घेत, विक्रेत्यांनी दुकानाच्या दर्शनी भागातच काळ्या रंगाच्या साड्या लावल्याचे दिसून आले.
आपल्याकडे काळा रंग अशुभ मानला जातो. मात्र मकरसंक्रांत हा एकमेव सण आहे की ज्याला काळे कपडे परिधान करून साजरा केला जातो. काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची ऊष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात. म्हणून थंडीमध्ये येणार्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे. त्यामुळे संक्रांत जवळ आल्याने बाजारांमध्ये महिलांसाठी काळ्या साड्या तर पुरुषांकरिता काळे कुर्ते दिसत आहेत.
बाजारपेठेत काळ्या रंगाच्या साड्या दुकानाच्या दर्शनी भागात लावलेल्या असून, तसेच लहान मुलींसाठी खणाचे व इरकल कापडाचे सुंदर फ्रॉकही उपलब्ध आहेत. संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करण्याची प्रथा आहे. पाच सुगडी पाटावर मांडून त्याची पूजा केली जाते. सुवासिनी पूजा झाल्यानंतर एकमेकींना वाण देतात.
हळदीकुंकू करतात. यासाठी बाजारात काळ्या व लाल रंगातील सुगड विक्रीस उपलब्ध आहेत. सुगडाला धनधान्याचे प्रतीक मानले जाते. म्हणून त्यामध्ये हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, तिळगूळ असे साहित्य भरले जाते. यासाठी बाजारात हरबर्याच्या घाट्या, गाजर, बोरे, ऊस यांची आवक झाली आहे.