Pimpri : रावेत, किवळे, पुनावळेतून हिंजवडीसाठी अतिरिक्त बसची मागणी

रावेत : रावेत, किवळे, पुनावळे व आदर्शनगर परिसरातून हिंजवडीसाठी सुरू केलेली बससेवा अपुरी पडत असून, प्रवाशांच्या संख्येनुसार या मार्गावर अतिरिक्त बस सोडाव्यात, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
शहराच्या रावेत, किवळे, पुनावळे व आदर्शनगर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्या कर्मचार्यांची संख्या ही अधिक आहे. आय. टी. क्षेत्रातील बहुतांशी मोठ्या कंपनीची कार्यालये ही हिंजवडी आय. टी. पार्क मध्ये आहेत. रावेत व किवळे परिसरातून हिंजवडीसाठी थेट बससेवा उपलब्ध नव्हती. त्यामुळे कर्मचारीवर्गाची ही अडचण दै.प्रभात ने मांडली होती.
या बातमीची दखल घेत, पीएमपीएमएल प्रशासनाने किवळे ते हिंजवडी बससेवा सुरू केली असून, त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. माफक दरात वातानुकूलित बससेवा असल्यामुळे प्रवाशांनी सुधा सार्वजनिक वाहतुकीकडे आपला मोर्चा वळविला आहे, मात्र प्रशासनाने कर्मचारी वर्गाच्या कामाच्या वेळेनुसार बसचे वेळापत्रक न आखल्याने विशेषत: आयटी पार्कमधील कर्मचार्यांना त्याचा फटका बसत आहे. तसेच सध्या एकच बस उपलब्ध असल्यामुळे बसच्या फेर्या कमी असून, यामध्ये वाढ करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
किवळे, रावेत, आदर्शनगर व पुनावळे येथून हिंजवडीकडे जाणार्या अधिकच्या फेरीच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात आला असून लवकरच किवळे व रावेत येथील नागरिकांसाठी मुक्काई चौक बस स्थानकातून नवीन बस चालू करण्यात येईल.
-सतीश गव्हाण,
मुख्य व्यवस्थापक, पीएमपीएमएलआय. टी. कर्मचार्यांची कामाची शिफ्ट ही वेगवेगळी असते. त्यामुळे सर्वच प्रवाशांचे बसच्या वेळापत्रकाबरोबर जुळत नाही. नवीन बस चालू करून फेर्या वाढवल्या तर कर्मचारी वर्गाला फायदा होईल. तसेच बसचे मार्ग अनेक गाव आणि वस्त्यांमधून असल्यामुळे विद्यार्थी आणि स्थानिक प्रवाशीदेखील या बसने मुकाई चौक बस स्थानकापर्यंत येऊ शकतील.
– ललित देशमुख, रहिवासी, किवळे





