Pimpri : पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे काम संथ गतीने

पिंपरी : पिंपरी डेअरी फार्म उड्डाण पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली होती. पुढील तीन महिन्यांत कामाची मुदत संपुष्टात येणार आहे. तरी देखील पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. मुदतीत काम पूर्ण करणे शक्य नसल्यामुळे ठेकेदार मुदतवाढ घेण्यासाठी बीआरटी स्थापत्य प्रकल्प विभागाकडे अतोनात प्रयत्न करत आहे.
पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपरी कॅम्प मार्गे पिंपरी गावातून पुणे-मुंबई महामार्गावर जाण्यासाठी वाहनांना पिंपरी डेअरी फार्म रस्त्याने बाहेर पडावे लागत होते. तर, पुणे-मुंबई महामार्गाने पिंपरी कॅम्पात व पिंपरी गावातून पुढे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागत होता. दरम्यान, लोहमार्गावर फाटक पडल्यानंतर दोन्ही बाजुला प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. तब्बल दहा ते पंधरा मिनिटे वाहनांना एकाच जागी थांबावे लागत होते.
त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होऊन नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. यावर तोडगा काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटी स्थपत्य प्रकल्प विभागामार्फत पिंपरी डेअरी फार्म रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्यास ३१ मार्च २०२३ रोजी सुरुवात करण्यात आली. उड्डाणपुलाची लांबी १ हजार २९० मीटर इतकी आहे. तर, रुंदी १७.२० मीटर इतकी आहे. या कामासाठी ६५ कोटी २८ लाख एवढा खर्च केला जात आहे.
उड्डाण पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत दिलेली आहे. पुढील तीन महिन्यात दोन वर्षांचा कालावधी संपुष्टात येत आहे. तरी देखील पुलाचे काम वेगाने मार्गी लावण्याच्या हालचाली दिसत नाहीत. अत्यंत संथ गतीने काम सुरु असल्यामुळे मुदतीत काम पूर्ण करणे शक्य नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कंत्राटदाराने पुलाचे शंभर टक्के काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडे मुदतवाढीची मागणी केली आहे. पुलाचे काम पूर्ण करुन घेण्याची अपरिहार्यता असल्यामुळे बीआरटी स्थापत्य प्रकल्प विभागाने मुदतवाढ देण्याची तयारी दर्षविली आहे. त्यामुळे पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ऑगस्ट २०२५ उजाडणार असून कंत्राटदाराला काम पूर्ण करण्यासाठी पाच महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
पिंपरी डेअरी फार्म उड्डाण पुलाच्या रचनेत काहीसा बदल करण्यात आला आहे. नव्याने तयार करण्यात आलेले पुलाचे डिजाइन लोहमार्ग विभागापुढे सादर केले जाणार आहे. त्यानंतर रेल्वे खात्याची परवानगी घेऊन पुलाच्या उर्वरित कामाला सुरुवात केली जाणार आहे. तब्बल दोन वर्षांची मुदत संपुष्टात येत असताना देखील पालिकेकडून रेल्वे खात्याची सुधारित परवानगी घेण्यास विलंब करण्यात आला. त्यामुळे पुलाच्या कामास आणखी एक अडथळा निर्माण झाला आहे. जोपर्यंत परवानगी मिळत नाही, तोपर्यंत हे काम अर्धवट स्थितीतच राहणार आहे. शिवाय कंत्राटदाराकडून कामाला गती दिली जात नसल्यामुळे मुदतवाढीत तरी काम पूर्ण होणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुलाचे डिजाइन तयार करुन त्याचे लोहमार्ग विभागाकडे सादरीकरण केले जाणार आहे. त्याला रेल्वे विभागाची परवानगी अपेक्षित आहे. परवानगी मिळाल्यानंतर पुलाचे काम मार्गी लागेल. त्यासाठी मुदतवाढ द्यावी लागणार आहे. मुदतवाढीसह ऑगस्ट २०२५ पर्यंत पुलाचे काम मार्गी लावले जाईल.
– प्रेरणा सिनकर, षाकार्यकारी अभियंता





