प्रभात वृत्तसेवा पिंपरी – दारू दुकानाच्या गल्ल्यातून पैसे चोरल्याच्या संशयातून एकाला लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 27) दुपारी 3 वाजता पिंपरीतील राधिका चौकाजवळ घडली.अनंत शशीराव कांबळे (वय 28, रा. पाचपीर चौक पंचनाथ कॉलनी, काळेवाडी) व शशिकांत दत्तात्रय गोडबोले (वय 23, रा. पाचपीर चौक, काळेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गणेश रामु शिरदाणे (वय 21, रा. साई चौक, फुटपाथवर पिंपरी) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी शुक्रवारी (दि. २८) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दुकानात काउंटरवर असताना “काउंटरमधले पैसे चोरलेस” असा आरोप करून आरोपींनी लोखंडी रॉडने पायावर, पाठीवर व चेहऱ्यावर मारहाण केली. फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.