प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी एकाच दिवशी तब्बल दहा टोळ्यांमधील ४९ सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्या (मोका) अंतर्गत कारवाई केली. गेल्या वर्षभरात एकूण ४५ टोळ्यांतील २२८ आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. कारवाई केलेल्या या टोळ्यांवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, खंडणी, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, प्राण्यांची कत्तल, अवैध ताबा, हत्यार बाळगणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे.चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोळीप्रमुख ओमकार मनोज बिसणारे (वय २३), अतुल तांबे, रामनाथ उर्फ टिल्या घोडके, रजत सय्यद, दिनेश दिवे व एका अल्पवयीनावर कारवाई झाली. एमआयडीसी महाळुंगे हद्दीत टोळीप्रमुख किशोर उर्फ साईनाथ कुन्हाडे (वय २८), विष्णू उर्फ बाळा कुऱ्हाडे, ओमकार टोके, ऋषीकेश सुळ आदींवर कारवाई झाली.हिंजवडी पोलीस ठाण्यातील दोन टोळ्यांवर मोका लावण्यात आला आहे. पहिल्या टोळीतील टोळीप्रमुख अर्शद काझी (वय २६) तसेच आफताब पठाण, वाजिद कुरेशी, अनिकेत चंदनशिवे यांच्यावर प्राण्यांवरील क्रूरतेशी संबंधित गुन्ह्यांप्रकरणी कारवाई झाली. दुसऱ्या टोळीतील टोळीप्रमुख गौतम कांबळे (वय १९), प्रथमेश तिपाले, अमय ठाकरे, अथर्व शिंदे, सुमित संदनशिव व समर्थ नगरकर यांच्यावर मोका लावण्यात आला.चिखली हद्दीत टोळीप्रमुख अक्षय जाधव (वय ३०) आणि त्याच्या साथीदारांवर तसेच दुसऱ्या टोळीतील गोविंदसिंग टाक, प्रेम रणदिवे यांच्यावर कारवाई झाली. तळेगाव दाभाडे येथे टोळीप्रमुख सनीसिंग दुधानी (वय २४) व साथीदारांवर, तर काळेवाडी येथे टोळीप्रमुख किशोर पांचाळ (वय २०) व साथीदारांवर मोका लागू करण्यात आला.वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोळीप्रमुख प्रफुल्ल ढोकणे (वय २६) आणि त्याच्या टोळीसह, तर निगडी हद्दीत टोळीप्रमुख सुशिल उर्फ बारक्या गोरे (वय २०) व त्यांच्या साथीदारांवर कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली.