प्रभात वृत्तसेवा पिंपरी – एका संगणक अभियंत्याला विविध शेअर आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५९ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना शनि मंदिर रोड, वाकड येथे घडली.ओलीवीया (विविध व्हॉट्सअॅप नंबर), विकास प्रसाद व अनेक बँक खातेदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. याबाबत शनि मंदिर रोड, वाकड येथील ४३ वर्षीय संगणक अभियंत्याने शनिवारी (दि. ६) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २ मे ते ६ डिसेंबर २०२५ या कालावधीत वाकड येथे घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला गुंतवणुकीनंतर १२ कोटी रुपये नफा दाखवला. फिर्यादीने नफा व गुंतवलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना १५ टक्के कर भरा अन्यथा पैसे मिळणार नाहीत” असा दबाव आणला. फिर्यादीने त्यांना ‘नफ्यातूनच कर वजा करा’ अशी विनंती केली असता त्यांनी नकार देत आणखी पैसे भरायला सांगितले. गुंतवणूक केलेले पैसे व नफा देण्यास नकार दिला. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.