प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश लागू असतानाही बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या आरोपींवर गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने प्रभावी कारवाई करत वेगवेगळ्या तीन ठिकाणी सात पिस्तुल हस्तगत केली. तर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने एक पिस्तुल हस्तगत केले. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. वाकड हद्दीतून एकास अटक वळुमाता डेअरी फॉर्मजवळ, ताथवडे परिसरात गुरुवारी (दि. ११ डिसेंबर) रोजी सायंकाळी गुंडा विरोधी पथकाने कारवाई करत समीर लक्ष्मण इजगज (वय २७, रा. मारुंजी, पुणे) याला अटक केली. त्याच्याकडे एक लाख, दोन हजार रुपये किंमतीची दोन देशी बनावटीची पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक विकम हंबीरराव जगदाळे यांनी फिर्याद दिली आहे. काळेवाडी येथे तरुण पकडला काळेवाडी परिसरातील नढे कॉर्नरजवळ गुरुवारी (दि. ११ डिसेंबर) रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने रोहित महादेव आगरखेड (वय २२, रा. पवनानगर, काळेवाडी) याला अटक केली. त्याच्याकडे ५० हजार ५०० रुपये किंमतीचे विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल व एक राऊंड सापडले. गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलीस हवालदार सागर दशरथ अवसरे यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिखलीत चार पिस्तुले जप्त गुरुवारी (दि. ११ डिसेंबर) रोजी सायंकाळी चिखलीतील सोनवणे वस्ती परिसरात गुंडा विरोधी पथकाने कारवाई केली. यामध्ये ओमकार सिद्धेश्वर बंडगर (वय २१), अभय विकास सुरवसे (वय २७, तडीपार), सुहास उर्फ पिल्या बालाजी गायकवाड (वय २७), या तिघांना अटक केली. आरोपींकडून चार पिस्टले व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. मनाई आदेशासह तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. गुंडा विरोधी पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक अमित पोपट गायकवाड यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मजुराकडून पिस्टल जप्त शुक्रवारी (दि. १२ डिसेंबर) रोजी मध्यरात्री आळंदी-मरकळ रोडवरील चौकात कारवाई करत धर्मेंद्र हरिप्रसाद सैन (वय २५, रा. खेड, पुणे) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे एक देशी बनावटीची पिस्टल व एक जिवंत काडतूस आढळले. गुंडा विरोधी पथकातील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर विष्णूबुवा गिरी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.