प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा, युनिट दोनच्या पथकाने घरफोडी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांमधील सराईत टोळीला कारवाई करी५त जेरबंद केले होते. या टोळीकडून २९ लाख ४४ हजार ७०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व शस्त्रे जप्त केली आहेत. तसेच १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत.सनीसिंग पापासिंग दुधानी, जलसिंग रजपुतसिंग दुधानी व मनिष बाबूलाल कुशवाह अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडीतील घरफोडीतून चोरलेली सेलेरिओ कार (MH14 JE 2628) रावेत येथील आणखी एका चोरीत वापरल्याचे समोर आले. गुन्हे शाखेने २०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचा संबंध लावून चोरट्यांचा मार्ग आणि हालचालींचा मागोवा घेतला.यानुसार सोमाटणे टोलनाक्यावर सापळा रचून कार अडविण्यात आली. अडथळा जाणवताच गाडीत बसलेल्या आरोपींपैकी एकाने पिस्तूलातून गोळी झाडून पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र झटापटीत गोळी गाडीवरच लागली आणि जीवितहानी टळली. पोलिसांनी शिताफीने या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून २ पिस्तुले, ७ जिवंत काडतुसे, धारदार हत्यारे आणि सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. दागिने खरेदी करणारे मावळ तालुक्यातील किरपानसिंग दुधानी, शांताराम उर्फ संतोष कांबळे आणि अक्षय चनाल यांनाही अटक करण्यात आली. अटक आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत घरफोडी करणारे असून त्यांच्यावर जवळपास ७० पर्यंत गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे आणि पथकातील अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.