प्रभात वृत्तसेवा पिंपरी – लग्नाचा तगादा लावल्याच्या रागातून विवाहित प्रियकराने आपल्या विवाहित प्रेयसीचा गळा दाबून खून केला. तसेच मृतदेह पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.राणी विशाल गायकवाड (वय २६, रा. सम्राट चौक, वाकड) असे खून झालेल्या विवाहित प्रेयसीचे नाव आहे. अनिकेत महादेव कांबळे (वय ३३, रा. गणेशनगर, थेरगाव) या विवाहित प्रियकराला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर रोजी राणी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी वाकड पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी तिच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता ती सतत अनिकेत कांबळेच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी अनिकेतच्या हालचालींवर गुप्तपणे नजर ठेवली असता तो अलिकडेच बार्शी-लातूर परिसरात फिरल्याचे समोर आले. राणी आणि अनिकेत यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही विवाहित आणि दोनही कुटुंबांना या नात्याची कल्पना असल्याने राणीने आपल्या पती व मुलांना सोडून अनिकेतसोबत राहण्याचा आग्रह धरला. मात्र आपल्या मुलांच्या जबाबदारीमुळे अनिकेत तिला स्वीकारण्यास तयार नव्हता. लग्नाचा सातत्याने तगादा लावल्याने अनिकेत त्रस्त झाला होता. “गावी नेऊन ठेवतो” असा बहाणा करून अनिकेतने राणीला कारमध्ये बसवले. प्रवासादरम्यान दोघांमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात अनिकेतने तिचा गळा दाबून जीव घेतला आणि मृत्यूची खात्री करण्यासाठी लोखंडी पाइपने वार केले. गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह लातूर-बार्शी महामार्गावरील ढोकी गावाजवळ नेला व पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह पूर्ण जळू शकला नाही. अनिकेतने सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी तांत्रिक पुरावे सादर केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी हत्या आणि पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.