प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पिंपळे सौदागरमध्ये धाड टाकत दी आॅरा थाई स्पा च्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. सात महिलांची सुटका करीत स्पा सेंटरच्या मालकास अटक केली आहे. रोस आयकॉन बिल्डिंगमध्ये सुरू असलेल्या या स्पामध्ये उच्चभ्रू ग्राहकांसाठी मसाजच्या नावाखाली देहविक्री केली जात असल्याची खात्रीशीर माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून शहानिशा केली आणि नंतर ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत सात महिलांची सुटका करण्यात आली असून त्यापैकी ५ ईशान्य राज्यांमधील (३ नागालंड, १ मिजोराम, १ त्रिपुरा) तसेच केरळ आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एक असे एकूण सात पीडित महिला मुक्त करण्यात आल्या.अभिजित लोरन्स (वय ३०, रा. पिंपळे सौदागर, मूळ रा. तिरुअनंतपुरम, केरळ) असे अटक करण्यात आलेल्या स्पा मालकाचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील श्रद्धा राजेश भरगुडे (वय ३९) या महिला पोलिसांने शनिवारी (दि. २९) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी अभिजित लोरन्स हा महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना देहव्यापारास प्रवृत्त करत असत. या माध्यमातून तो मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळवत होता, असे तपासात समोर आले आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता व पिटा कायद्यान्वये सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.