प्रभात वृत्तसेवा पिंपरी – दोन किलो सोने कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून दोन चोरट्यांनी १२ लाख ९५ हजार रुपये घेत एकाची फसवणूक केली. ही घटना ताजणे मळा, च-होली परिसरात उघड झाली आहे.याबाबत एका भाजी व्यवसायिकाने रविवारी (दि. १६) याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हि घटना ५ ते ११ नोव्हेंबर दरम्यान ताजणे मळा, च-होली येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांना तीन सोन्याचे मणी देऊन विश्वास संपादन केला. सोनाराकडे तपासणी केल्यावर ते मनी सोन्याचे खरे असल्याचे दिसून आले. त्यामुळे फिर्यादीचा विश्वास बसला. त्यानंतर आरोपींनी दोन किलो सोने देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून तब्बल 12 लाख 95 हजार रुपये घेतले आणि पुर्णपणे बनावट सोने देऊन फसवणूक केली. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.