प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ एकच्या वाहन चोरी विरोधी विशेष पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या पथकाकडून १५ लाख रुपये किमतीच्या ३७ मोटारसायकली व २ ऑटो रिक्षा जप्त करण्यात यश मिळवले आहे. मुबीन नुरमुहमद शेख (वय २५, रा. पिंपळे गुरव), फईज फिरोज शेख (वय २२, रा. धुळे), अमन प्रेमचंद शुक्ला (वय १९, रा. पिंपरी), सुनिल शांताराम मोरे (वय ३०, रा. ऊरळी कांचन, पुणे) आणि राजू शंकर मराठे (वय ४६, रा. मामुर्डीगाव, देहूरोड) यांच्यासह अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सीसीटीव्ही फुटेज पाहून करून संशयितांचा शोध लावला. त्यानंतर कौशल्यपूर्ण सापळा रचून वाहन चोरी करणारी टोळी पकडली.मेट्रो स्टेशन परिसर, गर्दीच्या पार्किंग्ज, तसेच ओसाड रस्त्यांवर नजर ठेवून ही टोळी महिनोन्महिने वाहनचोरी करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. जप्त करण्यात आलेल्या वाहनांपैकी अनेक बाईक पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे आणि मुंबई परिसरातून चोरून नेण्यात आल्या होत्या. काही वाहनांचे गुन्हे दाखल नसल्यामुळे त्यांची मूळ नोंद शोधण्याचे काम सुरू आहे. वाहनचोरीचे गुन्हे वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांनी विशेष मोहिम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त संदिप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांची देखरेख आणि सहायक निरीक्षक दिगंबर अतिग्रे उपनिरीक्षक विनायक पाटील यांच्या यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली.