प्रभात वृत्तसेवा पिंपरी – कंपनीतील वादाच्या कारणावरून एका टोळक्याने तरुणाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याचीही धमकी दिली. ही घटना आळंदी मरकळ रोडवर शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.किशन परसराम वरताळे (वय 28), साईनाथ किशन वरताळे (वय 24), समीर यादव गजभारे (वय 20) व एक काळा शर्ट घातलेला अनोळखी इसम आणि दोन अल्पवयीन मुले अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. धिरज ज्ञानेश्वर कोलते (वय 32, रा. गुरुदत्त कॉलनी, मोशी) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी शनिवारी (दि. ९) याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कंपनीमध्ये आरोपी किसन वरताळे याच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. याचा राग मनात धरून आरोपींनी आपसांत संगनमत करून शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास फिर्यादी धिरज यांचा रस्ता अडवून शिवीगाळ, लाथा बुक्क्यांनी तसेच कमरेच्या बेल्टने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. आळंदी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.