पिंपरी | वाल्हेकरवाडीत लहान मुलांसाठी उद्यान तयार करा; सुरज बाबर यांनी आयुक्तांकडे मागणी

पिंपरी – गुरुद्वारा, वाल्हेकरवाडी, चिंचवड ३३ परिसरात स्टॉर्म वॉटर लाईन, लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन तसेच येथील सोसायटी यांना जोडणारा नाला दुरुस्त करुन देण्यात यावा, अशी मागणी कृषी पर्यावरण शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेचे अध्यक्ष सुरज बाबर यांनी केली आहे.
यासंदर्भात बाबर यांनी आयुक्त शेखर सिंह आणि ब क्षेत्रीय अधिकरी यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहर शहराचे स्मार्ट सिटी म्हणून देशात नाव घेतले जाते. परंतु, येथील काही समस्या अजून प्रलंबित आहेत. पावसाळ्यात बऱ्याच कॉलन्या, सोसायट्यांमध्ये पाणी शिरते.
साई हाउसिंग सोसायटी येथे स्टॉर्म वॉटर लाईन नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. गुरुद्वारा परिसरातील कॉलनींला लागून असणारा नाला यामध्ये झाडेझुडपे वाढली आहेत. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी व नागरिकांसाठी गार्डन नसल्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत आहे.
चिंचवड येथील गुरुद्वारा परिसरातील नागरिकंच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. श्री साई हाऊसिंग सोसायटी (गुरुद्वारा रोड वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे स्टॉर्म वॉटर लाईन टाकून द्यावी. साई हाउसिंग सोसायटी, सरोवर कॉलनी, राजयोग कॉलनी यांना जोडून असणारा नाल्याचे तळभागाचे कॉंक्रिटीकरण करुन द्यावे. राजयोग कॉलनीच्या बाजूला सध्या महापालिकेने कचरा डेपो सुरु केला आहे. येथील समोरील मोकळ्या जागेमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन करून द्यावे, अशी मागणी बाबर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

