पिंपरी – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात दिवाळीच्या सांस्कृतिक उत्सवाला नव्या स्वरूपात रंग चढू लागला आहे. पारंपरिक दिवाळी पहाट आता केवळ संगीत आणि भक्तीपुरती मर्यादित न राहता, नागरिकांशी जोडणारा नवा सांस्कृतिक मंच बनत आहे. दिवाळी पहाट आता फक्त भक्ती आणि संगीतामुळेच नव्हे, तर राजकीय प्रचाराचा प्रभावी मंच म्हणूनही समोर येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने माजी नगरसेवक आणि इच्छुक त्यांचा प्रभावी वापर करताना दिसत आहेत. चिंचवड, निगडी, सांगवी, रावेत, वाकडमध्ये राजकीय पक्षांनी आपापल्या नावाने दिवाळी पहाट मैफल आयोजित करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मतदारांना आकर्षित करत राजकीय पक्ष मंडळींनी शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. हे कार्यक्रम फक्त सांस्कृतिक कार्यक्रम नसून, निवडणुकांमध्ये जनतेशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहे. राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मैफलींत मतदारांच्या मनात पक्षासाठी सकारात्मक भावना रुजवण्याचा प्रयत्न जोरात करत असल्याचे दिसून येत आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्ष प्रतिनिधी आणि स्थानिक नेते नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सकाळी ६ वाजता सुरू होणाऱ्या या मैफलींमध्ये चहा आणि नास्त्यासह राजकीय संवादाचे सूरही तापू लागतात. एकीकडे हार्मोनियम आणि तबल्याची संगत, तर दुसरीकडे माइकवरून भविष्यातील आश्वासने या अनोख्या मिश्रणामुळे दिवाळी पहाट आता निवडणूक पहाट बनू लागली आहे. नवा राजकीय ट्रेंड… आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सर्व पातळ्यांवर वेग घेऊ लागली आहे. प्रचारासाठी सांस्कृतिक दिवाळी पहाटचे कार्यक्रम हा नवा राजकीय ट्रेंड बनला आहे. नागरिकांचाही प्रतिसाद उत्सुकतेने मिळत असला तरी काहीजण याकडे पाठ फिरवताना दिसत आहेत.