पिंपरी – दरवर्षी दिवाळीनंतर गुलाबी थंडीची चाहूल लागते, असा समज आता केवळ आठवणीतच राहिला आहे. नोव्हेंबरच्या प्रारंभीही शहरात गारव्याऐवजी आभाळ ढगाळ, हवामान दमट आणि अधूनमधून पावसाच्या सरी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, नागरिकांचा त्रास वाढला असून “कुठे हरवले ते थंडीचे दिवस?” असा प्रश्न शहरवासीय विचारत आहेत. पूर्वी कार्तिक महिन्याच्या सुरुवातीपासूनच पहाटेच्या वेळी गारवा जाणवायचा. सकाळी फिरायला जाणारे नागरिक स्वेटर, मफलर, कानटोपीसह निघायचे. मात्र यंदा हवामानानेच तोंड फिरवले आहे. सकाळी हलक्या सरी कोसळतात, तर दुपारी उन्ह तापते. दिवसभर पावसाळ्यासारखी दमट हवा आणि संध्याकाळी पुन्हा गारवा जाणवतो. या अनिश्चित हवामानामुळे ऋतुचक्राचा समतोल बिघडल्याचे स्पष्टपणे जाणवते. आरोग्याच्या तक्रारींनी नागरिक हैराण वातावरणातील या वारंवार बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. सर्दी, ताप, घसा खवखवणे, डोकेदुखी अशा तक्रारी वाढल्या आहेत. खासगी दवाखान्यांपासून ते शासकीय रूग्णालयांपर्यंत सर्वत्र रुग्णांची गर्दी वाढलेली दिसत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी “सर्दी-ताप वाढण्यामागे हवामानातील अस्थिरता आणि ओलावा हे प्रमुख कारण” असल्याचे स्पष्ट केले आहे. थंडीचा पत्ता नाही, नागरिक गोंधळलेले नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण संपले तरी अद्याप हवामानात गारवा नाही. शहरातील सकाळी फिरायला जाणारे नागरिक थंडीपासून बचावासाठी स्वेटर ऐवजी छत्री व रेनकोट घेऊन जात आहेत. रात्री थोडासा गारवा जाणवला तरी तो क्षणिक ठरतो. परिणामी हिवाळ्याची चाहूल लागत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हवामान विभागाचा इशारा हवामान विभागाने येत्या काही दिवसांत शहरात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडीचा अनुभव घेण्याऐवजी नागरिकांना पावसाळ्यासारखे वातावरण सहन करावे लागणार आहे. एकूणच काय तर नागरिकांना हवीहवीशी गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. सतत बदलणारे हवामान आणि पावसाचा अनाहूत प्रवेश यामुळे “हिवाळा कधी येणार?” असा प्रश्न शहरात सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.