पिंपरी – पिंपरी-चिंचवडचा युवा क्रिकेटर ऋतुराज गायकवाड याच्या आजच्या कामगिरीकडे शहरवासीयांचे लक्ष असणार आहे. अवघ्या 23 वर्षांचा ऋतुराज इंडियन प्रिमियम लिग (आयपीएल) मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे.
गेल्या सामन्यात ऋतुराजने चेन्नईकडून सलामीला येत दमदार फलंदाजी करत 51 चेंडूत नाबाद 65 धावा केल्याने चेन्नई सुपर किंग्जला रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरचा आठ विकेट्सने पराभव केला. यामुळे आता आज कलकता नाईट राईडर्स विरुद्धच्या सामन्यात ऋतुराज कशी कामगिरी करतो, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
ऋतुराज हा मराठमोळा खेळाडू पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवीतील रहिवासी असल्याने त्याच्या गेल्या सामन्यात केलेल्या फलंदाजीचा आनंद दसऱ्याच्या दिवशी सर्व शहरवासीयांनी साजरा केला होता. ऋतुराजला पहिल्या सामन्यातच शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे त्याला चमकदार कामगिरीची चुणूक दाखविता आली नाही.
मात्र, दुसऱ्या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी परत विश्वास दाखवल्याने त्यांनी विश्वास सार्थ ठरवत, या सामन्यात नाबाद राहत दमदार फलंदाजी करत 51 चेंडूत चार चौकार व तीन उत्तुंग षटकार फटकावित क्रिकेटप्रेमींची मने जिंकली.
यामुळे गेल्या सामन्यात हिरो ठरलेला ऋतुराज पुन्हा आज कामगिरी कशी करणार? याकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.