पिंपरी – नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली असून ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवार सलग सुट्या आल्याने सरत्या वर्षात निरोप देण्यासाठी शहरातील हॉटेस्ल, लॉन्स तसेच शहरालगतच्या मावळ परिसरात गर्दी होत आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येस परिसरातील हॉटेल, रिसॉट्स तसेच अनेक सेकंडहोम ‘हाउसफुल्ल’ झाले असून, पर्यटकांनी जल्लोष सुरू केला आहे. येथील हॉटेलमध्ये खास व्यवस्था करण्यात आली आहे. शहर परिसरात रात्री बारा वाजेपर्यंत थीमवर गीत, नृत्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. ग्रप्ससाठी खास डिस्काउंट देण्यात येत आहे. तसेच खाद्य पदार्थांचीही रेलचेल असणार आहे. तसेच हॉटेल्स, मॉल्समध्ये विविध सवलतीच्या योजना जाहीर केल्या आहेत. तर, काही जणांनी सलग सुट्ट्यांचा उपयोग करण्यासाठी दोन दिवस बाहेर जाण्याच्या योजनाही आखल्या आहेत. तर, तरुणाई डीजेच्या तालावर नृत्य करण्यासाठी सज्ज झालेली आहे. नवीन वर्षानिमित्त मध्यरात्री १२ वाजेपर्यंत विविध मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नृत्य, धमाल गाणी यांचा समावेश आहे. केवळ हॉटेल्स, लॉन्स नाही, तर हाउसिंग सोसायट्यांमध्येही विविध कार्यक्रम असणार आहेत. त्यात विविध स्पर्धा, मनोरंजनाचे खेळ, भोजन, डीजेवर नृत्य गाणी यांचा समावेश आहे. सध्या शहरात म्हणावा तसा हिवाळा अजून जाणवत नाही. त्यामुळे सोसाट्यांचे हॉल, तसेच बाहेर शेकोट्या पेटवून त्या भोवती गीत, नृत्याचा कार्यक्रम रंगणार आहे. तर,सलग सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेकजण अधीच बाहेरगावी, पर्यंटनस्थळी गेलेले आहेत. अनेकांनी नदी किनारे, समुद्र किनाऱयांना पसंती दिली आहे. त्यात कोकणाला जास्त पसंती दिली असून पिंपरी चिंचवडच्या हकेच्या अंतरावर असेलल्या मावळ परिसरालाही पसंती मिळत आहे.