चिखली – पिंपरी चिंचवड महापालिकेने सर्वच क्षेत्रीय कार्यालयांना पावसाळ्यापूर्वी नाले, ड्रेनेज, स्ट्रॉर्मवॉटर लाइन साफसफाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार फ क्षेत्रीय कार्यालयाचे मागील आठवड्यातच 90 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. परंतु चिखली येथील साने चौकाजवळ ड्रेनेजलाइन तुंबल्याने मोठ्या प्रमाणावर मैलामिश्रित पाणी रस्त्यावरून वाहत आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या कामाची पावसाळ्यापूर्वीच पोलखोल झाल्याने महापालिकेने केलेली हीच का नालेसफाई असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी क्षेत्रीय कार्यालयांना आपल्या परिसरातील पावसाळ्यापूर्वीची सर्वच कामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सर्वच क्षेत्रीय कार्यालयानुसार पावसाळ्यापूर्वीची कामे जोरदार सुरू आहेत. त्यामध्ये रस्ते दुरुस्ती, ड्रेनेजलाइनची साफसफाई, पावसाळ्यातील पाणी वाहून नेहण्यासाठी असलेली स्ट्रॉर्म वॉटर लाइन दुरुस्ती आदी कामे करण्यात येत आहेत. सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये फ क्षेत्रीय कार्यालय पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्यात अग्रेसर आहे. मागील आठवड्यातच महापालिकेच्या आकडेवारीनुसार फ क्षेत्रीय कार्यालयाचे पावसाळ्यापूर्वीची 90 टक्के कामे पूर्ण झाली असल्याचा अहवाल आहे. परंतु क्षेत्रीय कार्यालयाकडून खरोखरच नालेसफाई, ड्रेनेजलाइन सफाईची कामे केली जातात की दिखावा असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.
साने चौक ते शिवरकर चौकादरम्यान अंगणवाडी रोडजवळ ड्रेनेजलाइन तुंबल्याने मोठ्या प्रमाणावर दूषित व मैलामिश्रित आणि दुर्गंधीयुक्त पाणी वाहत होते. सकाळसकाळीच नागरिकांची कामावर जाण्याची वेळ, या मार्गावर पादचारी आणि कामगार वर्गाची मोठी वर्दळ असते. बहुतांश नागरिक पायी जातात. यांना या दूषित पाण्यातून मार्ग काढत ये-जा करावी लागत होती. तर परिसरात दुर्गंधी येत होती. त्यामुळे आजूबाजूच्या व्यावसायिकांकडून प्रशासनाच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. हनुमान जिमच्या भागात तर मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी जमा झाले होते. त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना त्यातून वाट काढावी लागत होती. त्यामुळे महापालिकेच्या कामावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पादचाऱ्यांच्या अंगावर शिंतोडे
मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणे वस्ती आदी परिसरातील नागरिक चिखली, आकुर्डी, पिंपरी, चिंचवड या ठिकाणी जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. रस्त्याच चेंबर तुंबल्याने मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी वाहत होते. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर दुचाकी, चार चाकींमुळे शिंतोडे येत होते. त्यामुळे वाहनचालक आणि पादचारी यांच्यात वाद निर्माण झाले. तसेच जवळच भाजीमंडई असल्याने त्यांना देखील हातगाडी घेऊन जाताना या समस्येचा सामना करावा लागला.
आयुक्तांनी कामांची करावी पाहणी
पिंपरी चिंचवड महापालिका पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यासाठी नागरिकांचा कररुपी पैसा खर्च करत आहे. परंतु बहुतांश भागात केवळ काम केल्याचे कागादोपत्री दाखवले जात आहे. जर काही दिवसांपूर्वीच येथील ड्रेनेजलाइनची साफसफाई केलेली असेल तर वारंवार या भागांत ड्रेनेजलाइन का तुंबत आहेत, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष शहरातील कामांची पाहणी करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.