पोलीस आयुक्तांकडून विविध 37 सूचना : सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तयारी जोरात
पिंपरी – पिंपरी चिंचवडचा स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये समावेश झाला आहे. आता त्यापाठोपाठ शहरातील सर्व पोलीस ठाणीही स्मार्ट होणार आहे. यामध्ये पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या रंगापासून ते कामकाजाबाबत तब्बल 37 सूचना करण्यात आल्या आहेत. दिलेल्या सूचनांची पूर्तता करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.
पोलीस ठाण्याच्या इमारतीची मोती आणि निळा अशी रंगसंगती असावी. पोलीस ठाण्याच्या वतीने घेण्यात आलेले उपक्रम, गुन्हे नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचनांचे सादरीकरण एलईडीद्वारे करण्यात येणार आहे. पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांकरिता स्वतंत्र पार्किंग असावी आणि त्याबाबतचे फलकही पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर लावण्यात यावेत. तसेच प्रवेशद्वाराजवळ अंतर्गत नकाशाही लावण्यात यावा. अभ्यागतांच्या कक्षांमध्ये व्हिजिटर रजिस्टर, नागरिकांची सनद, गुणवत्ता धोरणाचा फलक लावण्याची सूचनाही मार्गदर्शक तत्वांमध्ये देण्यात आली आहे.
पोलीस ठाण्याकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर किमान अर्धा किलोमीटर अलिकडे आणि पलिकडे असे फलक लावण्यात यावेत, या फलकांवर रात्रीच्यावेळी दिसतील असे दूरध्वनी क्रमांकही लिहावेत. अधिकाऱ्यांच्या कक्षात अद्यायावत गुन्हे तक्त, आवक झालेल्या कागदपत्रांसाठी लाल ट्रे आणि पोलीस ठाण्याकडून पाठविण्यात येणारी जावक कागदपत्रे निळ्या ट्रेमध्ये ठेवण्यात येणार आहेत. हद्दीत सीसीटीव्हीची उपलब्धता आणि गर्दीच्या ठिकाणी आपण सीसीटीव्हीच्या कक्षेत असल्याचा फलकही लावण्यात येणार आहे.
महिला कक्षातही आवश्यक सुविधा
महिला कक्षातही आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रीक करण्यात येणार आहे. तसेच पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने वागायचे पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
अद्ययावत सुविधा
ज्या पोलीस ठाण्यात कोठडी उपलब्ध आहे त्याठिकाणची स्वच्छता, आरोपींची माहिती तसेच नियम फलक लावण्यात येणार आहेत. तसेच शस्त्रागाराची स्वच्छता आणि शस्त्रांबाबतची माहितीचा फलक आतील बाजूस लावण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पाच ढाली आणि कॅमेरा असणारे हेल्मेट उपलब्ध करून दिले जाणार आहे. पोलीस गस्तीसाठी सुस्थितील वाहने आणि त्यास जीपीएस लावण्यात येणार आहे. तसेच संगणकासाठी लागणारे सहित्याचा मुबलक साठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. पोलीस ठाण्यांमध्ये इंटरनेट, ओटीपी बेस फ्री वायफाय उपलब्ध करून दिला जाणार आहे. रेकॉर्ड रूम, तसेच मुद्देमालाचे वर्गीकरण करून त्या कक्षात सीसीटिव्ही कॅमरे लावण्यात येणार आहेत. सोलरवरील लाइट तसेच जनरेटरही पोलीस ठाण्यात ठेवण्यात येणार आहे.