Pimpri Chinchwad Temperature – मे महिन्याचे ‘मृगजळ’ आता केवळ भास उरला नसून, पिंपरी-चिंचवडकरांसाठी ते एक दाहक वास्तव बनले आहे. सोमवारी (दि. ११ मे) रोजी पिंपरी-चिंचवड शहराने उष्णतेचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले असून, यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. शहरातील डुडुळगाव येथे पारा तब्बल ४१.६°C वर पोहोचल्याने अवघे शहर अक्षरशः भट्टीसारखे पेटले आहे. सकाळी १० वाजल्यापासूनच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली होती. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील चिंचवडमध्ये ४०.७°C, तर तळेगाव पट्ट्यात ४०.८°C तापमानाची नोंद झाली. विशेष म्हणजे, एरवी शहरापेक्षा काहीसे थंड मानल्या जाणाऱ्या मावळ आणि लगतच्या ग्रामीण भागालाही सूर्याच्या प्रकोपाचा फटका बसला आहे. बारामती आणि वडगाव शेरीमध्येही ४१.२°C अंशांची नोंद झाल्याने संपूर्ण जिल्हाच उन्हाच्या लाटेने होरपळला आहे. रस्ते ओस, जनजीवन विस्कळीत शहरातील मुख्य चौक आणि रस्ते दुपारी १२ ते ४ या वेळेत ‘कर्फ्यू’ लागल्यासारखे ओस पडले होते. आयटी हब असलेल्या हिंजवडीपासून ते औद्योगिक पट्टा असलेल्या भोसरीपर्यंत उन्हाच्या झळांनी नागरिकांची दैना उडवली. वाढत्या उन्हामुळे शीतपेये, शहाळी आणि रसवंती गृहांवर नागरिकांची गर्दी दिसत असली, तरी उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही थांबणे कठीण झाले आहे. प्रशासनाचा ‘अलर्ट’ हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रावरून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे ही परिस्थिती उद्भवली असून येत्या ४८ तासांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. “उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी पांढरे, सुती कपडे वापरावेत. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्यावी,” असे आवाहन वैद्यकीय प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडने आज पुणे जिल्ह्याच्या तापमानात आघाडी घेतल्याने, आता मान्सूनच्या सरी कधी बरसणार, याकडे चातकाप्रमाणे डोळे लावून बसलेल्या नागरिकांची चिंता वाढली आहे. ‘स्मार्ट सिटी’ आता ‘हॉट सिटी’ बनल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.