पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील 1 हजार 235 शिक्षकांना महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शिक्षक दिनाची भेट दिली आहे. या शिक्षकांना धन्वंतरी स्वास्थ योजना लागू करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला यश आल्यामुळे शिक्षक संघटनांसह शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.
शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीने शिक्षण दिनाच्या दिवशी आंदोलनाचा दिला होता. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळेतील शिक्षकांना धन्वंतरी योजना लागू करण्यासंदर्भात सोमवारी (दि.4) पालिकेत बैठक झाली. या बैठकीला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांच्यासह शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी तसेच कुटुंब व्याख्येनुसार, त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबीय आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी धन्वंतरी स्वास्थ योजना 1 सप्टेंबर 2015 पासून सुरू करण्यात आली. योजना सुरू झाल्यानंतर कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक धन्वंतरी योजनेच्या पॅनलवरील रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. कुटूंब व्याख्येनुसार कर्मचारी, त्याची आई, वडील, दोन मुले अशा पाच व्यक्तींचा समावेश कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांमध्ये करण्यात आला आहे. या योजनेमध्ये पालिकेच्या माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा समावेश होता. पालिकेच्या 105 प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. या शिक्षकांचा समावेश करण्याची सातत्याने शिक्षकांसह शिक्षक संघटनांची मागणी होती. त्यासाठी निवेदने, आंदोलनही करण्यात आली. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून 1 हजार 235 शिक्षकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
दरमहा 300 रूपये स्वहिस्सा भरावा लागणार
शिक्षकांना धन्वंतरी योजनेसाठी दरमहा 300 रूपये इतका स्वहिस्सा आणि सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना दरमहा 150 रूपये स्वहिस्सा जमा करावा लागणार आहे. हे पैसे त्यांच्या वेतनातून अथवा पेन्शनमधून कट केले जाणार आहेत. एकूण जमा होणाऱ्या हिश्श्याच्या दुप्पट रक्कम महापालिकेला धन्वंतरी निधीत पैसे जमा करावे लागतात.