पिंपरी -उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत वॉशिंग सेंटरचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात शहरात तब्बल 387 वॉशिंग सेंटर आढळले असून यामध्ये 36 सेंटरचे नळ कनेक्शन तोडण्यात आले आहे. तर 39 सेंटर अनधिकृत आढळून आले असून या सर्व सेंटर चालकांकडून पाणीपट्टी वसूल करण्यात येणार आहे. तसेच सेंटर चालकांवर गुन्हे दाखल करणार असून दुर्लक्ष करणाऱ्या मीटर निरीक्षकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी मंगळवारी (दि.9) दिली. शहराला गेल्या साडेतीन वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. उन्हाळा सुरू होताच शहरातील विविध भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे महापालिकेने पिण्याचे पाणी वॉशिंग सेंटर, उद्याने अथवा मोटारी धुण्यासाठी वापरल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला होता. याच अनुंषगाने शहरातील वॉशिंग सेंटर चालक मोटारी धुण्यासाठी पाणी कोठून वापरतात? याचा शोध घेण्यासाठी पाणी पुरवठा विभागाच्या वतीने शहरातील वॉशिंग सेंटरचे फेर सर्वेक्षण करण्यात आले. शहराच्या विविध भागात 387 सेंटर असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. यामध्ये 38 वॉशिंग सेंटर चालकांनी पाणी वापरासाठी व्यावसायिक परवाना घेतला आहे. 290 सेंटर चालक बोअरवेल, विहीर पाण्यावर अवलंबून आहेत. 39 सेंटर अनधिकृत आढळून आले असून 36 जणांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले आहे. अशा सेंटर चालकांकडून पाणीपट्टी दंडासह वसुल करण्यात येणार आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच अशा वॉशिंग सेंटर चालकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेच्या मीटर निरीक्षकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जांभळे-पाटील यांनी दिली.