पिंपरी – शाळा सुरू होऊन दोन महिने उलटल्यानंतरही पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील 6 हजार विद्यार्थ्यांना डीबीटीचा लाभ मिळालेला नाही. तर 34 हजार विद्यार्थ्यांना डीबीटीचा लाभ देण्यात आला आहे. महापालिकेच्या 105 प्राथमिक तर 18 माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये 40 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना दरवर्षी महापालिकेच्या वतीने दोन शालेय गणवेश, एक पीटी गणवेश, एक स्वेटर, एक रेनकोट दिला जातो. तसेच शालेय साहित्यामध्ये दप्तर, वह्या, पुस्तके, बूट, प्रयोगवही व इतर साहित्य दिले जाते. दप्तर, वह्या, पुस्तके, बूट, प्रयोगवही अशा विविध साहित्यांचे वाटप न करता त्याचे पैसे विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. 40 हजारपैकी 34 हजार विद्यार्थ्यांना डीबीटीचा लाभ देण्यात आला असून 6 हजार विद्यार्थी अद्याप लाभापासून वंचित आहेत. दप्तर, रेनकोट, काळे बूट, पीटी शूज, मोजे, पाणी बॉटल, कंपास पेटी, व्यवसायमाला, स्वाध्यायमाला, चित्रकला वही, नकाशा, 100 आणि 200 पानी वही या साहित्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या अथवा पालकांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 3500 तर पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 3700 रूपये देण्यात आले आहेत. दोन हजार विद्यार्थ्यांचे बॅंक खाते, आयएफएससी क्रमांक चुकीचे दिले आहेत तर 4 हजार विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणिकीकरण बाकी आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षक त्याचा आढावा घेत आहेत. योग्य माहिती मिळताच उर्वरित विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येईल. – विजयकुमार थोरात, सहाय्यक आयुक्त, शिक्षण विभाग