पिंपरी-पर्यावरण संवर्धन आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाची जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या “रिव्हर सायक्लोथॉन’साठी पर्यावरण प्रेमी, नागरिक आणि स्वयंसेवी संस्था-संघटनांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सुमारे 25 हजार हून अधिक नागरिकांनी सायकल रॅलीमध्ये सहभाग घेत “रिव्हर सायक्लोथॉन’चा उपक्रम अभूतपूर्व यशस्वी केला.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र अशा विविध संस्था-संघटनांसह शाळा-महाविद्यालयांच्या पुढाकाराने “रिव्हर सायक्लोथॉन-2022′ चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा प्रारंभ राज्याचे उच्च शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सायकलपटू प्रिती म्हस्के, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल आदी उपस्थित होते. अविरत श्रमदान संस्था आणि संयोजन समितीचे डॉ. निलेश लोंढे, दिगंबर जोशी, शिवराज लांडगे, डॉ. आनंद पिसे, बापू शिंदे, सुनील बेळगावकर, डॉ. अश्विनी वानखेडे, सीमा शादबार, तृतीय पंथी प्रतिनिधी गायत्री थेरगावकर यांच्यासह विविध संस्था-संघटनांच्या प्रतिनिधी रॅली यशस्वी करण्यात पुढाकार घेतला.
अविरत श्रमदान व संयोजन समितीचे प्रमुख डॉ. निलेश लोंढे म्हणाले की, महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून आणि सर्व संस्था-संघटनांच्या पुढाकाराने एकूण 20 हजार 103 नागरिकांनी प्रत्यक्ष नोंदणी केली होती. रॅलीच्या ठिकाणी 3 हजारांहून अधिक नागरिकांनी नोंदणी केली. त्यामुळे सुमारे 25 हजारांहून नागरिक या ऐतिहासिक रॅलीत सहभागी झाले आहेत. महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले, नागरिकांचा आजचा उत्साह पाहाता केवळ मोठ्या कार्यक्रमांसाठीच नव्हे, तर नियमितपणे सायकलपटूंसाठी प्रशासनाने काम केले पाहिजे. सायकल ट्रॅक आणि संबंधित प्रकल्प गतीमान केले पाहिजेत, याची जाणीव झाली.
महेश लांडगे जागतिक विक्रम करतील – पाटील
उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमदार लांडगे यांच्या पुढाकाराने झालेली ही रिव्हर सायक्लोथॉन देशातील सर्वांत मोठी आहे. हा विक्रम पुढच्या वर्षी स्वत: लांडगेच मोडतील. आजच्या गर्दीची संख्या पाहता पुढील वर्षी जागतिक विक्रम नोंदवला जाईल. सायकलपटू एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरतील, ही संस्मरणीय बाब आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी 50 हजारांहून अधिक सायकलपटूंची रॅलीसाठी नोंदणी करा, मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करुन उपस्थित राहण्याची विनंती करतो, असे आवाहनही पाटील यांनी केले.
इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी “रिव्हर सायक्लोथॉन’मध्ये सहभागी झालेल्या सर्व सायकलपटू, पर्यावरण प्रेमी आणि पिंपरी-चिंचवडकर नागरिकांचे आभार व्यक्त करतो. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होताना पिंपरी-चिंचवडकर म्हणून विशेष अभिमान वाटतो. पर्यावरणाचा जागर करण्यासाठी पुढकार घेणारी पिंपरी-चिंचवड महापालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र यांसह अनेक संस्था, संघटना आणि अप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या सहयोगाबाबत कृतज्ञता व्यक्त करतो. पर्यावरणाचे संवर्धन करुया.. आपली पवित्र इंद्रायणी वाचवूया.
-महेश लांडगे, शहराध्यक्ष, भाजपा तथा आमदार