पिंपरी – महापालिकेच्या विविध विभागांतील ब आणि क गटातील चार पदांचा निकाल बुधवारी (दि.30) रात्री उशिरा महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. याबाबत “दैनिक प्रभात”ने बुधवारीच परीक्षार्थींना निकालाची प्रतीक्षा असल्याचे वृत्त दिले होते. या वृत्तानंतर प्रशासनाने वेगवान हालचाली करून बुधवारी रात्रीच निकाल जाहीर केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील 388 जागांसाठी राज्यातील 26 शहरातील 98 केंद्रांवर टाटा कन्स्लटन्सी सर्विसेसच्या (टीसीएस) माध्यमातून दि. 26, 27 व 28 मे परीक्षा झाली. 55 हजार 82 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पालिकेने 11 पदांच्या 35 जागांसाठी (दि.7) ऑगस्ट निकाल जाहीर केला होता. मात्र, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लिपिक या चार पदांचा निकाल रखडला होता. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा होऊनही निकाल लावण्यास विलंब का होत आहे, असा सवाल परीक्षार्थीं उपस्थित करत होते.
11 पदांच्या 35 जागांसाठी दि.7 ऑगस्टला निकाल जाहीर झाल्यानंतर चार पदांच्या निकाल स्वातंत्र्य दिनापूर्वी लावण्याचा मुहूर्त प्रशासनाने दिला होता. मात्र, हाही मुहूर्त हुकल्याने परीक्षार्थींकडून महापालिका आणि परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीवर मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. अखेर दै. प्रभातने बुधवारी वृत्त प्रसारित करताच प्रशासनाने वेगवान हालचाली केल्या. त्यानंतर रात्री उशिरा महापालिकेच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षार्थीं पालिकेच्या संकेतस्थळावर जावून निकाल पाहू शकतात, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी दिली.
पदनाम पदसंख्या
लिपिक 213
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 74
कनिष्ठ अभियंता स्थापत्य 48
कनिष्ठ अभियंता (विद्युत) 18
एकूण 353