Pimpri Chinchwad Rain – पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी (दि. ३०) दुपारी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. शहरात हिंजवडी, वाकड, थेरगाव या भागामध्ये गारा पडल्या. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यावर असलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. दुपारी तीन वाजता शहरातील विविध भागात पावसाला सुरुवात होताच वाऱ्यासह मुसळधार सरी कोसळू लागल्या. अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि चमक यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः उघड्यावर असलेल्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. शहरातील विविध मेट्रो स्थानकांखाली नागरिकांनी आसरा घेतल्याचे चित्र दिसून आले. पावसाचा जोर इतका होता की काही मिनिटांतच रस्त्यांवर पाणी साचू लागले. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही पावसाचा मोठा परिणाम दिसून आला. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी वाहतूक मंदावली, तर काही भागात वाहनांच्या रांगा लागल्या. विशेषतः नाशिकफाटा, भोसरी, हिंजवडी, वाकड, भूमकर चौक या भागामध्ये मोठी वाहतूककोंडी झाली होती. दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पिंपरी चिंचवड, अवकाळी पाऊस शहरातील मुख्य चौक, बाजारपेठा आणि रहदारीच्या रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे काही ठिकाणी जलनिस्सारण व्यवस्थेचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. नाले आणि गटारांची योग्य साफसफाई न झाल्याने पाणी साचल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जुन्या पुणे मुंबई रस्त्यावर पाणी बाहेर जाण्याच्या ठिकाणी झाडांचा पालापाचोळा अडकल्याने वाहिन्या बंद झाल्या. या अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले. अचानक पाऊस आल्याने फेरीवाले आणि छोटे व्यावसायिक आपला माल वाचवण्यासाठी धावपळ करताना दिसले. काही ठिकाणी पावसाचे पाणी दुकानदारांच्या दुकानात शिरल्याने आर्थिक नुकसान झाले. हवामान खात्याने पुढील काही दिवसांतही अशाच प्रकारचा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महापालिकेने जलनिस्सारण यंत्रणा सक्षम करण्याची गरज असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. अचानक कोसळलेल्या या अवकाळी पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला असून प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कासारवाडीत किरकोळ अपघात कासारवाडी याठिकाणी मुंबईकडून पुण्याच्या दिशेला जाणारी पाच चारचाकी वाहने ग्रेडसेपरेटरमध्ये एकमेकांवर आदळली. सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झाले नाही. मात्र वाहनाचे नुकसान झाले. तसेच यामुळे वाहतूककोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येत वाहतूककोंडी सोडवली. त्यामुळे बाकीच्या वाहनचालकांना रस्ता मोकळा झाला.