पिंपरी – महापालिकेच्या तालेरा रुग्णालयातील दैनंदिन साफसफाईच्या कामासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात उपलब्ध तरतूद 59 लाख रुपये असताना या कामासाठी 1 कोटी 51 लाख रुपये खर्च करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्याला महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. वैद्यकीय विभागाकडून एका रुग्णालयाच्या अंतर्गत साफसफाईवर एवढ्या मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे चिंचवड येथे तालेरा रुग्णालय आहे. वैद्यकीय उपचार अथवा तपासणीसाठी रुग्णालयात दैनंदिन रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अंतर्गत परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी वेळोवेळी साफसफाई करावीच लागते. तालेरा रुग्णालयातील इमारतीमधील कॉरिडोर, सर्व कार्यालये, अंतर्गत भाग, स्वच्छता गृहे, इमारतीच्या बाह्य परिसरातील साफसफाई करण्याचे काम केले जाणार आहे. वैद्यकीय विभागाच्या लेखाशीर्षावर चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात 59 लाख 14 हजार रुपयांची तरतूद आहे. मात्र, साफसफाईवर 1 कोटी 51 लाख रुपये खर्च केला जात आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त शेखर सिंह यांनी या कामाच्या खर्चाला मान्यता दिली आहे.
पालिका महिन्याला 5.80 लाख देणार
वैद्यकीय विभागाकडून दोन वर्षाच्या कालावधीसाठी ही निविदा राबविण्यात आली आहे. मे. सक्षम फॅसिलिटी सर्व्हिसेस कंपनीला हे काम देण्याचा निर्णय झाला आहे. याकामी प्रति महिना या संस्थेला 5 लाख 84 हजार 593 रुपये रक्कम दिली जाणार आहे. त्यानुसार दोन वर्षासाठी महापालिका 1 कोटी 51 लाख रुपये या ठेकेदार संस्थेला अदा करणार आहे. रुग्णालये, शाळा, क्षेत्रीय कार्यालये यातील स्वच्छतेच्या नावाखाली पालिकेकडून करोडो रुपयांची बिले काढली जातात. त्यामुळे स्वच्छतेवर पालिकेकडून करोडो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे.