पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात बीआरटीतून येणाऱ्या नागरिकांवर सध्या जोरदार कारवाई सुरू आहे. अथवा एखाद्या वाहनचालकाने नियमाचे उल्लंघन केले तर वाहतूक नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्यांसह वॉर्डनदेखील गाडी थांबवून पावती करण्यासाठी सतर्कता दाखवत आहेत. परंतु शहरातील बहुतांश रस्त्यांवर अवजड आणि अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असून देखील वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस मात्र याकडे कानाडोळा करत असताना दिसून येत असल्याने इतर वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अशा अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील भोसरी, चिखली, मोशी, कुदळवाडी आदी परिसरातील बहुतांश रस्त्यांवर क्षमतेपेक्षा अधिक लोड भरून वाहने रस्त्यावरून प्रवास करत आहेत. बऱ्याच वेळा चौकात वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस कर्मचारी असतात. परंतु ते देखील याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. परंतु एखाद्या दुचाकी अथवा चार चाकी गाडीने नियमांचे उल्लंघन केले की कारवाई करण्यासाठी धावून येताना पाहून नागरिकांना आश्चर्य वाटत आहे. बऱ्याच भंगार व अवजड वाहतूक करणाऱ्या उद्योग, व्यावसायिकांचे पोलिसांबरोबर साटेलोटे असल्याची चर्चा यानिमित्त होताना दिसून येत आहे. पिंपरी ते चिखली मार्गावर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर वाहतूक होताना दिसून येत आहे. सोमवारी (दि. 15) रात्री शाहूनगर, पूर्णानगर परिसरात एक मोठी गाडी क्षमतेपेक्षा अधिक माल भरून वाहतूक करत होते. ही गाडी भोसरीकडून कुदळवाडी परिसरात चाललेली होती. परंतु ही गाडी कोणत्याच चौकात अथवा सिग्नलवर वाहतूक पोलिसांनी अडविली नाही. या गाडीत मोठ्या प्रमाणावर भंगार साहित्याची पोती भरून एकावर एक थर रचले होते. त्यातील काही भाग दोरीने बांधलेला होता. परंतु बराच भाग हपकत होता. त्यामुळे या गाडीचे मागे चालताना दुचाकी अथवा इतर लहान मोठी वाहने अंतर ठेवून चालत होती. तर दुचाकी चालकांच्या मनात अपघाताचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे वाहतूक प्रशासनाने अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवून कारवाई करणे गरजेचे आहे. वाहतूक पोलिसांनी शहरातील अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वाहनचालक आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य व निष्पाप व्यक्तींचे रस्ते अपघातात बळी जात आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रण नियमाने होणे गरजेचे आहे. – सारिका पवार, अध्यक्षा, एकता प्रतिष्ठान. पूर्णानगर येथेअपघाताच्या दोन घटना मागील काही महिन्यांपूर्वी पूर्णानगर परिसरात अवजड वाहनांचा दुचाकीला धक्का लागून दोन अपघात झाले होते. यात दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला होता. त्या वेळी येथील चौक काही महिने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. तसेच वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस नियुक्त करण्यात आले होते. परंतु काही काळ गेल्यानंतर पुन्हा हा चौक वाहतुकीसाठी खुला केला आहे. परंतु या मार्गावरील अवजड आणि अवैध वाहतुकीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने पुन्हा अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.