वडगाव मावळ (किशोर ढोरे) – वडगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे. एकाच परिसरात एक-दोन नव्हे तर तब्बल 12 शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत. मात्र वाहने उभी करण्यासाठी एकही शासकीय किंवा खासगी पार्किंग नाही. एवढ्या वर्षात नगर पंचायत पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरली आहे. प्रत्येकजण मनात येईल तिथे पार्किंग करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. “प्रत्येक जण किंग, अस्ताव्यस्त पार्किंग’, असे चित्र पहायला मिळत आहे. परिणामी आधीच अरूंद असलेले रस्ते आणखीनच अरूंद होत आहेत. वाहतूक पोलिसही बेशिस्त पार्किंगबाबत बोटचेपी भूमिका घेत असल्याने ही समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे.
वडगाव मावळमधील एकाच परिसरात बारा शासकीय कार्यालये आहेत. याठिकाणी सार्वजनिक पार्किंगची किंवा खासगी “पे अँड पार्क’ची व्यवस्था नसल्याने शासकीय कार्यालयात कामासाठी आलेले नागरिक येथील रस्त्यावरच वाहने उभी करतात. यामुळे येथील रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. येथील रस्त्यावर दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास वाहतूक कोंडी होते. यामुळे वडगाव याठिकाणी सार्वजनिक पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे. याशिवाय दुय्यम निबंधक कार्यालय व न्यायालय याच परिसरात असल्याने बहूतांश वकीलांची कार्यालये, खासगी बॅंका, राजकीय पक्षांची कार्यालयेही याच परिसरात असल्याने नागरिकांचा मोठ्या प्रमाणात राबता असतो.
येथे जवळच असलेल्या रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रोडवर देखील दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने रेल्वे प्रवाश्यांना देखील या वाहनांच्या कोंडीतून कसा बसा मार्ग काढत ट्रेन पकडावी लागते. त्यात एखादा दिव्यांग किंवा वृध्द प्रवासी असल्यास त्यास या परिसरातून जाणे मोठे मुश्किल होते. पूर्वी महसूल विभाग कार्यालयाच्या मागील बाजूस मोठी मोकळी जागा होती. त्याठिकाणी सर्व वाहने पार्किंग करण्याची सोय होती. मात्र मागील दीड वर्षांपासून या जागेत नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने ही जागा देखील आता पार्किंगसाठी उपलब्ध नाही. अनेक नागरिक या कोंडीला कंटाळून आपली वाहने महामार्गाच्या सेवा रस्त्यावर उभी करून एक दीड किलोमीटर चालत येथील शासकीय कार्यालयात येतात.
एकाच परिसरात ही आहेत शासकीय कार्यालये
तहसिल कार्यालय
वडगाव पोलीस ठाणे
भूमि अभिलेख कार्यालय
नागरी सुविधा केंद्र
न्यायालय
दुय्यम निबंधक कार्यालय
वन विभाग कार्यालय
कृषी विभाग
पंचायत समिती
सार्वजनिक बांधकाम विभाग
खादी ग्रामोद्योग
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक
रेल्वे स्टेशन
…तर नगर पंचायतीलाही महसूल मिळेल
या ठिकाणी नगरपंचायतीच्या माध्यमातून आसपासच्या परिसरात “पे अँड पार्क’ची व्यवस्था केल्यास नागरिकांची सोय होईल. तसेच वाहतूक कोंडीची समस्या सुटेल आणि नगरपंचायतीला महसूल देखील उपलब्ध होईल.