पिंपरी – योजक संस्था 5 वी ते 12 वीच्या गरजू विद्यार्थ्यांवर काम करते. मुला-मुलींसाठी वस्ती पातळीवर मोफत लर्निंग सेंटर चालविले जाते. या केंद्रात मुलांच्या अभ्यासाशी संबंधित अडचणी सोडविल्या जातात. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत केली जाते. योजक संस्थेचे काम कासारवाडी, मोरवाडी, आनंदनगर, भाटनगर, मिलिंदनगर, मोहननगर, ओटा स्कीम निगडी, आकुर्डी, शांतीनगर, धावडेवस्ती, लांडेवाडी, गाव्हाणेवस्ती तसेच खेड परिसरात विविध कंपन्याच्या सहकार्याने सुरू आहे.
पिंपरी चिंचवड आणि खेड भागामध्ये बजाज ऑटो लिमिटेड कंपनीच्या सी.एस. आर.च्या माध्यमातून विविध ठिकाणी लर्निंग सेंटरचे काम सुरू आहे. त्यामध्ये निगडी ओटा स्कीम हा भाग अतिशय संवेदनशील आहे. या भागामध्ये जाण्यास किंवा त्या भागाबद्दल ऐकण्यास लोकांना नकोसे वाटते. अशा भागात योजक संस्थेद्वारे बजाज ऑटो लिमिटेड कंपनीच्या सी.एस.आर.च्या माध्यमातून लर्निंग सेंटर सुरू केले. योजक संस्थेच्या संस्थापिका रेणू इनामदार यांचा एकमेव उद्देश वस्तीमधील प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे, त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात, घराच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण घेण्याचे स्वप्न अपूर्ण राहू नये. त्यासाठी संस्थेचे कार्यक्रम अधिकारी श्याम वावरे व त्यांचे सहकारी सुमन नामदे, रोहित माचरे यांनी घरोघरी जाऊन पालकांच्या भेटी, सभा घेऊन विद्यार्थ्याना लर्निंग सेंटरला येण्यास प्रवृत्त केले.
ओटा स्कीम या भागात लर्निंग सेंटर सुरू करण्यास जागा मिळावी म्हणून महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी काम करण्यास परवानगी दिलीच पण त्याचबरोबर प्रोत्साहन पण दिले. तसेच माहिती दिली की प्रत्येक वस्तीमध्ये समाज मंदिरे, बौद्ध विहारे स्थापन केली आहेत ते वापरण्याचा अधिकार वस्तीमधील लोकांना दिला आहे. ओटा स्कीम निगडीमधील राजरत्न बौद्ध विहार हे सगळ्यात वेगळे आहे. येथील संस्थापक अध्यक्ष रमेश गायकवाड, शिवशरण हिपरीकर, शिवशरण गायकवाड, भीमराव गवळी यांनी विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून एका शब्दात राजरत्न बौद्ध विहार उपलब्ध करून दिले.
विविध विषयांचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
लर्निंग सेंटरचा लाभ 200 पेक्षा जास्त विद्यार्थी घेत आहेत. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गणित, विज्ञान, इंग्रजी व संगणक या विषयातील तज्ज्ञ शिक्षक त्याना मार्गदर्शन करतात. तसेच शालेय अभ्यासात येणाऱ्या अडचणी सोडवीत असतात. विद्यार्थ्याना वैयक्तिक व सामूहिकरीत्या समुपदेशन करण्यासाठी योजक संस्थेने एका महिला समुपदेशकाची नेमणूक केली आहे. या वस्तीतील विद्यार्थ्याना इतर मोठ्या शाळांतील विद्यार्थ्यांप्रमाणे बाह्य जगातील अनुभव मिळण्यासाठी योजक संस्था विविध ठिकाणी शैक्षणिक अभ्यास सहलीसाठी घेऊन जाते. तसेच त्याना विज्ञान व तंत्रज्ञान माहित व्हावे तसेच त्यांचा कल विज्ञान व तंत्रज्ञान कडे जावून ते स्वतःच्या पायावर उभे राहावे म्हणून सतत प्रयत्नशील असते.
विद्यार्थ्यांचे मान्यवरांकडून कौतुक
मागील वर्षी इयत्ता दहावीचे 20 पैकी 20 विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले. त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी 11 वी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला. तसेच काही विद्यार्थी आयटीआयकडे गेले. विद्यार्थ्यांचे हे यश पाहून बजाज ऑटो लिमिटेड कंपनीचे विजय वावरे, रेश्मा आंधळे, योजक संस्थेच्या रेणू इनामदार, कार्यक्रम अधिकारी श्याम वावरे व राजरत्न बौद्ध विहारचे संचालक रमेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
ओटा स्कीम बनतेय सुशिक्षित
विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे आई-वडील सुद्धा शिकून पुढे जावे असा योजक संस्थेचा मानस आहे. टेक महिंद्रा फाउंडेशन यांच्या सोबत चर्चा करून विद्यार्थ्यांच्या पालकांना तसेच वस्तीमधील इतर महिलांसाठी General Duty-ssistant हा अभ्यासक्रम वस्तीमध्ये सुरु केला आहे. या अभ्यासाक्रमानंतर त्याना खासगी दवाखान्यात चांगल्या पगाराची नोकरी उपलब्ध करून देण्यात येईल. आज राजरत्न बौद्ध विहार व योजक संस्था तसेच बजाज ऑटो लिमिटेड कंपनीच्या पुढाकाराने निगडी ओटा स्कीम वेगळ्या रूपाने समोर येत आहे.