पिंपरी चिंचवड – रस्त्यावर रोज एक बळी ! दहा महिन्यांत 730 अपघात : 290 जणांचा मृत्यू

पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात अपघातांचे आणि त्यात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. सरासरी रोज एका व्यक्तीचा शहरात रस्ते अपघातात मृत्यू होत आहे. राष्ट्रीय क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, पिंपरी चिंचवड शहरात 2022च्या पहिल्या दहा महिन्यांत 730 अपघातांची नोंद आहे. त्यात 290 जणांचा मृत्यू झाला असून 448 जण जखमी झाले आहेत. याचाच अर्थ की दर तिसऱ्या अपघातात रस्त्यावर कुणाचा तरी बळी जातोय, हे मृत्यू रोखणे मोठी गरज बनली आहे. अपघातग्रस्त नागरिकांना गोल्डन अवरमध्ये तातडीने उपचार मिळावेत, यासाठी आता सरकारही प्रयत्न करत आहे. यासाठी गुड समेरिटन अर्थात अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना तात्काळ रुग्नालयात नेणाऱ्या जबाबदार नागरिकाला गुड समेरिटन म्हणतात. गुड समेरिटन पार पाडत असलेल्या जबाबदार कर्तव्यामुळे अनेकांना जीवनदान मिळत आहे. रस्ते अपघातांमध्ये जखमी व्यक्तीवर गोल्डन अवरमध्ये उपचार होणे आवश्यक आहे. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचविणाऱ्या गुड समेरिटनला सन्मानित करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून ही समिती दर तीन महिन्यांनी आढावा घेणार आहे.
रस्ते अपघात झाल्यानंतर क्षणार्धात बघ्यांची गर्दी होते. मात्र रुग्णालयातील किचकट प्रक्रिया आणि पोलिसांच्या तपासाला घाबरून अनेकजण घटनास्थळावरून काढता पाय घेतात. ज्या व्यक्तीने जखमीला मदत केली आहे, त्याच व्यक्तीकडे पोलीस संशयाने चौकशी करतात, असे अनेकांचे अनुभव सांगतात. ही बाब लक्षात घेत शासनाने अशा व्यक्तींच्या अधिकारांबाबत थेट राजपत्रच प्रकाशित केले आहे. जखमी व्यक्तींना रुग्णालयात पोहोचविणाऱ्या गुड समेरिटनचे अधिकार त्यात सांगण्यात आले आहेत. तसेच अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नागरिकांना प्रेरित करण्यासाठी विविध योजना देखील सुरू केल्या जात आहेत.
केंद्राची गुड समेरिटन पुरस्कार योजना
केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने गुड समेरिटन पुरस्कार योजना जाहीर केली आहे. यासाठी महाराष्ट्रात राज्यस्तरीय देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे. पाच सदस्यीय समितीत अपर मुख्य सचिव (गृह) अध्यक्ष असतील. आयुक्त (आरोग्य सेवा), प्रधान सचिव (विशेष/गृह), अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) हे तीन सदस्य आणि परिवहन आयुक्त सदस्य सचिव असणार आहेत. या समितीकडून दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाणार आहे. हीच समिती दरवर्षी 30 सप्टेंबर पर्यंत राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांसाठी सर्वात योग्य तीन गुड समेरिटनचे नामांकन करणार आहे.
गुड समेरिटनचे अधिकार
अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्या व्यक्तीला रुग्णालयाकडून अथवा पोलिसांकडून थांबवून राहणे बंधनकारक नाही. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करून संबंधित व्यक्ती जाऊ शकतो. रुग्णालयातील दाखल करून घेण्याची अन्य प्रक्रिया, बिल देण्यासाठी त्याच्यावर दबाव आणता येणार नाही. संबंधित व्यक्तीला त्याचे नाव, ओळख, पत्ता आणि अन्य वैयक्तिक माहिती रुग्णालयाला अथवा पोलिसांना देणे बंधनकारक नाही. व्यक्ती आपल्या स्वेच्छेने ही माहिती देऊ शकतो. व्यक्तीने माहिती दिली असता त्याला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बनवणे बंधनकारक नाही. तो अधिकार संबंधित व्यक्तीचा असेल. प्रत्येक रुग्णालयाला हिंदी, इंग्रजी आणि स्थानिक भाषेत गुड समेरिटनच्या अधिकारांबाबत माहिती सार्वजनिक ठिकाणी लावणे बंधनकारक आहे. अशी व्यक्ती पोलीस प्रत्यक्षदर्शी म्हणून जबाब देण्यास तयार झाली तर त्या व्यक्तीचा जबाब एकाच वेळी नोंदवून घ्यावा लागेल.





