पिंपरी – शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू तयार व्हावेत यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रयत्नशील आहे. जलतरणपटूंना तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळावे या यासाठी असे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना शहरातील 5 जलतरण तलाव सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत. तसेच जलतरण तलावांचा वार्षिक उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक असल्याने पीपीपी तत्वावर जलतरण तलाव चालविण्यास देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. यामुळे महापालिकेची आर्थिक बचत होईल, असा दावा करण्यात येत आहे. परंतु यापूर्वी पालिकेने हॉकी स्टेडियम खासगी संस्थेला देऊन स्थानिक खेळाडूंना सुविधांपासून वंचित केले आहे. तसेच काहीसे आता जलतरण तलावांबाबत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांना विविध सेवा-सुविधा देण्यात येतात. याच अनुषंगाने शहरात महापालिकेच्या वतीने जलतरणपटूंना सरावाची सुविधा उपलब्ध व्हावी, नागरिकांना, विद्यार्थ्यांना पोहण्याचा आनंद घेता यावा, यासाठी केशवनगर, संभाजीनगर, कासारवाडी, पिंपरी वाघेरे, यमुनानगर, पिंपळे गुरव, नेहरूनगर, वडमुखवाडी, भोसरी, मोहननगर, थेरगाव, सांगवी, आकुर्डी या भागांत 13 जलतरण तलावांची उभारणी करण्यात आली आहे. शहराचा उद्योगनगरी म्हणून नावलौकिक आहे. शहराला क्रीडानगरी म्हणून लौकिक मिळवून देण्याच्या दृष्टीने तसेच शहरातील खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. जलतरणपटूंना दर्जेदार प्रशिक्षण घेण्यासाठी तसेच सराव करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराबाहेर जावे लागते. ही सोय शहरात उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेने काही तलाव सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे चालविण्यास देण्याचे ठरवले आहे. तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना महापालिकेच्या एकूण 13 जलतरण तलावांपैकी 5 जलतरण तलाव सार्वजनिक खासगी भागीदारीतून अर्थात पीपीपी तत्वावर चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. त्या संस्थांकडून खेळाडूंसाठी स्वतंत्र प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होईल. तसेच या खेळाडूंना तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण देखील दिले जाईल. शहरातील विविध भागात पालिकेचे 13 जलतरण तलाव आहेत. जलतरण तलावांचा वार्षिक देखभाल खर्च मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने 13 जलतरण तलावांपैकी 5 जलतरण तलाव पीपीपी तत्वावर चालविण्यास देण्यात येणार आहेत. – बाळासाहेब खांडेकर, सहाय्यक आयुक्त, क्रीडा विभाग “हे” जलतरण तलाव चालविण्यास देणार कासारवाडी, यमुनानगर, पिंपरी वाघेरे, पिंपळे गुरव, वडमुखवाडी चऱ्होली जलतरण तलाव असे 5 तलाव पीपीपी तत्वावर चालविण्यास देण्यात येणार आहेत. उर्वरीत तलाव महापालिकेच्या वतीने चालविण्यात येणार आहेत. तर आकुर्डीत तलावाची खोली मोठी असल्याने याची खोली कमी करण्याचा पालिकेच्या वतीने प्रयत्न करण्यात आला. मात्र, या तलावाची खोली कमी करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे हा जलतरण तलाव कायमचा बंद करण्याचा पालिकेने निर्णय घेतला आहे.