पिंपरी (प्रतिनिधी) – वाढती लोकसंख्या एक मोठी समस्या बनून समोर आली आहे. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वच पातळ्यांवर सरकार आणि प्रशासन काम करत आहे. महापालिकेने देखील कुटुंब नियोजनासाठी अंतरा या इंजेक्शनवर विशेष भर दिल्याचे दिसून येत आहे. पाळणा लांबवण्यासाठी राज्य सरकारने “अंतरा’ हे गर्भनिरोधक इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहे. पाच महिन्यांत पिंपरी चिंचवड शहरातील 517 महिलांनी या गर्भनिरोधक इंजेक्शनचा वापर केल्याची माहिती पालिका वैद्यकिय विभागाने दिली आहे. यामुळे तसेच गर्भपाताचे प्रमाणही कमी होणार आहे. गर्भपात करण्यापेक्षा गर्भनिरोधकांचा वापर वाढावा यादृष्टीने कुटुंब कल्याण विभागाने या इंजेक्शनच्या वापरासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू केले आहेत. पालिकेच्या रुग्णालयालयात हे इंजेक्शन मोफत दिले जाते. इंजेक्शनचा वापर थांबवल्यानंतर सात ते 10 महिन्यांनी पुन्हा गर्भधारणा होऊ शकते. प्रसूतिनंतरच्या कालावधीमध्ये स्तनदा मातांसाठीही ते उपयुक्त आहे. हे इंजेक्शन वापरल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम जाणवत नसल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. काय सांगतात आकडे… पाच महिन्यांत 517 महिलांनी घेतले इंजेक्शन पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया17 स्त्री नसबंदी शस्त्रकिया2,629 कॉपर टी3,278 गर्भनिरोधक गोळ्या वाटप11,445 निरोध वाटप1,49,719 अंतरा लाभार्थी517 सेंचरोमन वाटप2,396 काय आहे “अंतरा’? शहरातील पालिका रुग्णालयांमध्ये “अंतरा’ निशुल्क दिले जाते. तोंडावाटे घ्याव्या लागणाऱ्या औषधांचे दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे अंतरा इंजेक्शनला प्राधान्य देण्यात येत आहे. प्रसुतीनंतर सहा आठवड्यांनी अंतरा हे इंजेक्शन घेतल्यास पुढील प्रसूतीही टळू शकते. 18 ते 35 वयाच्या महिलांना हे इंजेक्शन देण्यात येते. सगळी जबाबदारी महिलांचीच? कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलांचीच असल्याची पुरुषी मानसिकता अजूनही दिसून येत आहे. अपत्य होऊ नये म्हणून शहरातील 2629 स्त्रियांनी शस्त्रक्रिया करुन घेतली आहे. तर केवळ 17 पुरुषांनी नसबंदीची शस्त्रक्रिया करुन घेतली आहे. आरोग्यावर दुष्परिणाम करणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या देखील महिलांनाच दिल्या जातात. महापालिकेकडून आतापर्यंत 11 हजारांहून अधिक गोळ्यांचे वाटप झाले आहे. याहून कैक पटीने अधिक गोळ्यांची विक्री खासगी मेडिकलमधून होत आहे.