पिंपरी चिंचवड पालिका राबविणार 285 जागांसाठी शिक्षक भरती

पिंपरी, दि. 18 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे शिक्षण विभागाकडून नवीन 285 जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सहायक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक या दोन पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या भरतीनंतर पालिकेतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध होणार आहे.
शहरात महापालिकेच्या एकूण 105 प्राथमिक शाळा आहेत. त्यातील 21 शाळा सध्या मुख्याध्यापकाविना सुरू आहेत. तर, शिक्षकांचीही कमतरता आहे. मुख्याध्यापकांच्या 21 जागांवर पात्रता धारण करणा-या शिक्षकांना लकरच पदोन्नती देण्यात येणार आहे. मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक या दोन्ही पदांवर शैक्षणिक अर्हता व सेवा कालमर्यादेनुसार पात्र शिक्षकांना पदोन्नती दिल्यानंतर शिक्षकांची संख्या आणखी कमी होणार आहे. तर, काही शिक्षक सेवानिवृत्त होणार आहेत. त्यातच रिक्त होणा-या जागा भरण्यासाठी प्राथमिक विभागाकडून कंत्राट पध्दतीने शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. एकूण 285 शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. त्यातील काही पदे सहायक शिक्षक आणि काही पदवीधर शिक्षक म्हणून भरली जाणार आहेत.
ही भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असून येत्या काही दिवसांतच याची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे. सहायक शिक्षक पदासाठी डीएड ही अर्हता असणार आहे. तर, पदवीधर शिक्षक पदासाठी बीएड ही शैक्षणिक अर्हता निर्धारित राहणार आहे. मेरिट तपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मेरिटमधल्या उमेदवारांचीच निवड केली जाणार आहे. या शिक्षकांचा कंत्राट कालावधी सहा महिन्याचा राहणार आहे. त्यांना प्रतिमहा 20 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी दिली.
सध्या सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्याचे काम हाती आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पात्र शिक्षकांना पदोन्नती दिली जाणार आहे. या तांत्रिक बाबी पूर्ण करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. लवकरच पात्र शिक्षकांना मुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे. तसेच, निवृत्त शिक्षकांच्या जागा विचारात घेऊन एकूण शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
– संदीप खोत, उपायुक्त – शिक्षण विभाग





