पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे आज मतदान होणार आहे. मुरलेल्या राजकारण्यांप्रमाणे सर्व उमेदवार आणि त्यांचे समर्थक गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रचार करत आहेत. सर्वच पॅनेलमधील महापालिका कर्मचारी उमेदवार नियमानुसार सुट्टी न घेताच प्रचार मोहिमेवर होते. प्रत्येक विभाग आणि कार्यालयांमध्ये जाऊन हे कर्मचारी उमेदवार पतसंस्थेतील पारदर्शक कारभाराची हमी देऊन पत पुरवठ्याचा विश्वास देत होते. या प्रचारामुळे महापालिका भवनात सोमवारी (दि. 11) नागरिकांची कमी पण प्रचारासाठी उमेदवारांची अलोट गर्दी झाली होती. महापालिका सेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत तीन पॅनेल तयार झाले आहेत. स्व. शंकर (अण्णा) गावडे कर्मचारी महासंघ नारळ चिन्हावर, आपला महासंघ कपबशी चिन्हावर आणि शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंच पॅनेल टिव्ही चिन्हावर निवडणूक लढवित आहे. 19 जागांसाठी तिन्ही पॅनेलचे 54 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यात 14 जागा सर्वसाधारण, दोन जागा महिलांसाठी आणि अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय व भटक्या विमुक्त जाती-जमातींसाठी प्रत्येकी एक जागा राखीव आहेत. त्यासाठी अनुक्रमे 38, पाच, चार, तीन आणि चार उमेदवार रिंगणात आहेत. 3 हजार 739 कर्मचारी मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत. त्यासाठी आज मंगळवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रचारासाठी आजचा दिवस शेवटचा होता. त्यामुळे उमेदवारांनी महापालिका भवनासह क्षेत्रीय कार्यालये, विभागीय कर संकलन कार्यालये, रुग्णालये आदी पालिकेच्या आस्थापनांमध्ये पोस्टर्स लावून जोरदार प्रचार केला. एवढेच नाही, तर आज दिवसभर पॅनेलच्या प्रचारार्थ त्या-त्या गटातील कर्मचारी दिवसभर काम सोडून मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात गुंतले होते. त्यामुळे महापालिका भवनाला निवडणुकीचे स्वरुप आले होते. नागरिक केंद्रीत प्रशासकीय कामे बाजूला ठेऊन सर्वच विभागातील बहुसंख्य कर्मचारी उमेदवारांच्या नावाचा जयजयकार करीत होते. गळ्यात आपआपल्या पॅनलच्या पट्ट्या अडकवून हात जोडून मतदान करण्याची मतदारांपुढे विनवणी केली जात होती. नागरिकांच्या कामात व्यत्यय निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पॅनेलचे उमेदवार अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून अधिकाऱ्यांना मतदान करण्यासाठी विनंती करीत होते. त्यांच्या प्रचारामुळे नागरिकांची कामे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात व्यत्यय निर्माण झाला. त्यामुळे इच्छा नसताना अधिकाऱ्यांना प्रचारासाठी आलेल्या उमेदवारांसोबत हितगुज साधावे लागत होते. या निवडणुकीचा फायदा घेऊन काही कर्मचारी कामावर असताना इकडे तिकडे फिरत होते. त्यामुळे प्रचारातील उमेदवारांबरोबरच अशा वेळकाढू अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेचे अतोनात नुकसान झाले असून नागरिकांची अतिमहत्वाची कामे रखडली आहेत.