- संकल्पना राबविणारे देशातील पहिले शहर ठरणार पिंपरी–चिंचवड
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 2030 पर्यंतचा विचार करून “हरित सेतू’ विकसित करण्याचा महत्वाकांक्षी आणि नाविण्यापूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी आपल्या सूचना, सल्ला आणि कल्पना सुचवाव्यात, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
या माध्यमातून महापालिकेच्या सर्व उद्यानांना तसेच शहरात असणाऱ्या हरित क्षेत्रांना पादचारी मार्ग (फुटपाथ) अथवा सायकल मार्गाने जोडण्यात येणार आहे. या बहुप्रतिक्षित उपक्रमाचा शुभारंभ 29 ऑक्टोबर 2020 रोजी करण्यात आला. “हरित सेतू’ या महत्वपूर्ण मुद्यावर आधारित असलेल्या मूळ संकल्पनेतून हा उपक्रम स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येणार आहे.
आरोग्यदायी वातावरण व पर्यावरणपूरक जीवनमान अधिक उंचावण्यासाठी हा उपक्रम पथदर्शी ठरणार आहे. शहराला राहण्यासाठी अतिशय उत्तम शहर बनविण्याच्या दृष्टीकोणातून हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे आयुक्त म्हणाले. पर्यावरणपूरक साधनांचा प्रभावी वापर करून शहरभर विखुरलेल्या हरित क्षेत्रांना एकमेकांना जोडल्यास शहराची पर्यावरणीय गुणवत्ता वाढून त्याचा लाभ शहरवासियांना होईल. शहर विकासात या उपक्रमाचे अनन्यसाधारण महत्व असणार आहे. पिंपरी चिंचवड शहराला राहण्यायोग्य असलेले देशातील सर्वोत्तम शहर बनविण्यासाठी नागरिकांनी आपल्या कल्पना द्याव्यात असेही आयुक्त यावेळी म्हणाले.
समर्पित सायकल मार्ग आणि पादचारी मार्गांचा वापर करून नागरिकांना सुरक्षितपणे एका हरित क्षेत्र अथवा उद्यानापासून इतर उद्यानांपर्यंत जाता येईल अशाप्रकारे या उपक्रमाची रचना करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये सद्यस्थितीत 184 विकसित केलेली उद्याने आहेत. उद्यानांबरोबरच मोकळ्या जागा ही या हरित पट्ट्याद्वारे एकमेकांना जोडल्या जाणार आहेत. चारचाकी अथवा इतर वाहनांचा वापर करून होणाऱ्या वाहतुकीऐवजी हरित सेतू हा एक उत्तम पर्याय मिळणार असून हरित क्षेत्रातील नागरिकांचा प्रवेश सुखकर व सहज होण्यास मदत होणार आहे.
शहरातील विकसित करण्यात आलेली आणि येणार असलेली हरित क्षेत्रे व उद्याने एकमेकांना पादचारी मार्ग आणि समर्पित सायकल ट्रॅकद्वारे जोडण्याची संकल्पना संपूर्ण शहरात राबवावी, अशी शिफारस पीसीएमसी स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीच्या संचालकांनी केली आहे. या सुचनेवरून संपूर्ण शहराचा विचार करून हरित सेतू विकास आराखडा तयार करण्याचे काम महापालिकेने सुरू केले असून ही संकल्पना राबविणारे देशातील पहिले शहर असेल, असेही महापौर ढोरे आणि आयुक्त हर्डीकर यांनी म्हटले आहे.
नागरी सहभाग महत्वाचा
सर्वांच्या सहकार्याने हरित सेतू विकास आराखडा तयार करण्याचा महापालिकेचा मानस आहे. यासाठी तज्ज्ञांची विविध नावीण्यपूर्ण बाबींबद्दल चर्चात्मक कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. तसेच शहरातील नगारिकांच्या सूचनांचाही या उपक्रमामध्ये सहभागी केले जाणार आहे. तसेच शहरातील नगररचनाकार, संकल्पक, स्वयंसेवी संस्था, या क्षेत्रातील विविध तज्ञ आणि महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे अधिकारी कर्मचारी, शैक्षणिक तज्ञ यांच्या सहभागातून हरित सेतू उपक्रमाची मुलभूत रचना करण्यात येईल.
हरित सेतू उपक्रमाची उद्दिष्टे
– पादचारी मार्ग, समर्पित सायकल ट्रॅकद्वारे हरित क्षेत्रातील प्रवेश सुधारित करणे
– हरित क्षेत्रामध्ये नागरिकांचा वावर सुरक्षित करणे
– शहराचे पर्यावरण संतुलन आणि राहणीमान गुणवत्ता वाढविणे