पिंपरी – पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकासाठी बांधलेली घरे घेण्यासाठी अर्ज करण्यास शेवटचे तीनच दिवस उरले आहेत. ही मुदत शुक्रवारी (दि. 28) संपणार असून नागरिकांनी घरासाठी अर्ज करावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने आर्थिक दुर्बल घटकासाठी आकुर्डीतील मोहननगर आणि पिंपरीतील उद्यमनगर येथे गृहप्रकल्प बांधले आहेत. मोहननगर येथील गृहप्रकल्पात एकूण 568 सदनिका आहेत. तर, उद्यमनगर येथील गृहप्रकल्पात एकूण 370 सदनिका आहेत. हे दोन्ही गृहप्रकल्प तयार आहेत. सदनिकेसाठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागास वर्ग (ओबीसी) व दिव्यांग असे आरक्षण आहे. मोहननगर येथील सदनिकेसाठी 7 लाख 35 हजार 255 रुपये आणि उद्यमनगर येथील सदनिकेसाठी 7 लाख 92 हजार 699 रुपये स्वहिस्सा भरावा लागेल. त्यासाठी नागरिकांकडून 28 जूनपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही प्रकल्पातील 938 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहे. आतापर्यंत एकूण 10 हजार 177 नागरिकांनी ऑनलाइन अर्जासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यापैकी 3 हजार 455 जणांनी 10 हजार 500 रुपये भरून अर्ज केले आहेत.
या अर्जासोबत नागरिकांना 10 हजार रुपये अनामत रक्कम व 500 रुपये नोंदणी शुल्क ऑनलाइन भरावे लागतात. या रकमेसह उद्यमनगर येथील सदनिकांसाठी 1 हजार 358 आणि मोहनगरमधील सदनिकांसाठी 2 हजार 97 अर्ज प्राप्त झाले आहेत. 28 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील. अर्ज करण्याची मुदत शुक्रवार (दि. 28) पर्यंत आहे. त्याला केवळ तीनच दिवस उरले आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.
आकुर्डीतील मोहननगर आणि पिंपरीतील उद्यमनगर या दोन गृहप्रकल्पातील घरांसाठी नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. आजअखेर 10 हजार 177 नागरिकांनी ऑनलाइन अर्जप्रक्रिया केली आहे. तर, दोन्ही प्रकल्पांसाठी मिळून 3 हजार 455 अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज करण्याची मुदत शुक्रवारपर्यंत (दि. 28) आहे. मुदतीनंतर पात्र अर्जांची यादी करून त्याची सोडत प्रक्रिया राबविल्यानंतर सदनिकांचे वितरण केले जाईल.
अण्णा बोदडे,
– सहायक आयुक्त, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग