पिंपरी – पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहन व परवानाच्या विविध शुल्कातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा नवा उच्चांक गाठला आहे. 2021-22 मध्ये आरटीओ कार्यालयाला 621 कोटी 12 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. तर 2022-23 या आर्थिक वर्षांसाठी 796 कोटींचे उदिष्ट असताना तब्बल 874 कोटी 70 लाख रूपयांचा महसूल मिळाला आहे. उदिष्टांपेक्षा 78 कोटी 70 लाखांचे अधिकचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली. औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट सिटी, मेट्रो सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहराची लोकसंख्या वाढत असताना शहर चारही बाजूने वाढत आहे. त्यामुळे शहरातील वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्यस्थितीत पिंपरी-चिंचवड आरटीओकडे 23 लाख 92 हजार 521 वाहनांची नोंद असून शहराची लोकसंख्या सुमारे 30 लाखांच्या घरात आहेत. यामुळे वाहनांच्या वाढती संख्येचा आलेख दिसून येत आहे. दुसरीकडे वाहनांची संख्या सातत्याने वाढत असतानाच प्रदुषणाचा आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचीही समस्या दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली आहे. वाहनांसाठी रस्ते अपुरे पडतात की काय? अशी शंका आता उपस्थित केली जाऊ लागली आहे. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाला वाहन परवाना, पसंती क्रमांक, विविध दंड यासह विविध शुल्कातून उत्पन्न मिळत असते. वाहनांची नोंदणी वाढत असताना आरटीओचे उत्पन्नही जोरदार वाढत आहे. 2019-20 मध्ये आरटीओचे उत्पन्न 585 कोटी 68 लाख, 2020-21 मध्ये करोनाचा फटका बसल्याने आरटीओचे उत्पन्न कमी झाले. त्यानंतरही या वर्षांत आरटीओला 439 कोटी 58 लाख, 2021-22 मध्ये करोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर 621 कोटी 12 लाख, 2022-23 मध्ये आत्तापर्यंतच्या इतिसहासात प्रथमच 874 कोटी 70 लाख रूपयांचे उत्पन्न आरटीओला मिळाले आहे. विशेष म्हणजे 2022-23 मध्ये 796 कोटींचे उदिष्ट असताना 78 कोटी 70 लाखांचे अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. चार वर्षांत वाढल्या तीन लाखांहून अधिक दुचाकी पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांपासून वाहनांची संख्या वर्षांन-वर्ष वाढताना दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने कार, दुचाकी, रिक्षा, व्यावसायिक वाहने, बस या वाहनांची संख्या लक्षणीय आहे. 2019-20 मध्ये 1 लाख 52 हजार 286, 2020-21 मध्ये 96 हजार 839, 2021-22 मध्ये 1 लाख 7 हजार 151, 2022-23 मध्ये 1 लाख 62 हजार 641 वाहनांची नोंद झाली आहे. गेल्या चार वर्षांत सर्वाधिक दुचाकी वाहनांची म्हणजे तब्बल 3 लाख 21 हजार 308 तर 1 लाख 32 हजार 458 कारची नोंदणी झाल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी सांगितले.