पिंपरी चिंचवड : मेट्रो अखेर पुण्यात पोहोचणार

पिंपरी -गेल्या चार वर्षांपासून दिल्या जात असलेल्या वेगवेगळ्या तारखांना आता पूर्णविराम लागणार असून मेट्रो अखेर पिंपरीतून पुण्यापर्यंत धावणार आहे. पिंपरी-चिंचवड ते पुणे पर्यंत होणारा शहरवासियांचा प्रवास सुखकर होणार आहे. दोन्ही शहरे 1 ऑगस्टपासून मेट्रोने जोडली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर हा मार्ग सुरू होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्यावर्षी पुणे मेट्रोचा पिंपरी-चिंचवडी ते फुगेवाडी हा मार्ग सुरू करण्यात आला होता. सुरुवातीचे काही दिवस या मार्गावर पिंपरी-चिंचवड करांनी उत्सुकतेपोटी प्रवास केला. मात्र, त्यानंतर या मार्गाला अपेक्षित प्रवासी मिळत नव्हते. मेट्रो सेवेचा पुढील मार्ग त्वरीत सुरू करण्याची मागणी शहरातील नोकरदारांनी केली होती. यानंतर महामेट्रोनेही पुढील मार्ग सुरू होण्याबाबत सातत्याने तारखा जाहीर केल्या जात होत्या. त्यानंतर वारंवार मुदत मागितली. प्रत्यक्षात मेट्रो कधी सुरू होणार, हे स्पष्ट नसल्याने नागरिकांकडूनही टीका होत होती.
अखेर पुण्यापर्यंत सहा किलोमीटरच्या मेट्रो मार्ग सुरू होण्याला मुहुर्त मिळाला आहे. 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या विस्तारित सेवेचे उद्घाटन होणार आहे. मेट्रोच्या विस्तारित सेवेत फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय या मार्गाचा समावेश आहे. या सर्व मार्गांसाठी जिल्हा न्यायालय हे इंटरचेंज स्टेशन असेल. त्यामुळे पुणेकरांना आता वनाज ते थेट पिंपरी-चिंचवड आणि रुबी हॉस्पिटलपासून पिंपरी-चिंचवड ते वनाजपर्यंत मेट्रोचा प्रवास करता येणार आहे. यामुळे शहरवासियांनाही सुखकर प्रवास करता येणार आहे.
त्याच मार्गावर पुन्हा लोकार्पण
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट (17 किमी) या मेट्रोच्या मार्गिका एकचे काम पूर्ण झालेले नसतानाही मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छोट्याशा अंतराचे लोकार्पण करुन घेतले. त्यानंतर यावर्षी देखील पुढील थोड्या अंतराचे पंतप्रधानाच्या हस्ते लोकार्पण करुन घेण्यात येत आहे. एकाच मार्गिकेचे दोनदा लोकार्पण होऊनही अजूनपर्यंत मार्गिका एकचे काम पूर्ण झालेले नाही. पूर्ण मार्गिकेचे काम झाल्यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधानांना बोलविणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.





