पिंपरी चिंचवड – मेट्रो बनले पर्यटनाचे केंद्र

पिंपरी, दि. 25 (प्रतिनिधी) -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतरही पिंपरी ते फुगेवाडीच्या पुढे अजून मेट्रो जाऊ शकलेली नाही. या लहानशा अंतरासाठी मेट्रो हे केवळ एक पर्यटनाचे साधन बनले असून मेट्रो सध्या तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून सक्षम दिसत नाही. त्यामुळे जलदगती प्रवास, खासगी वाहनांना पायबंद आणि वायू प्रदूषण रोखण्यास सर्वोत्तम पर्याय ठरणारी मेट्रो नागरिकांच्या दृष्टीने सध्यातरी उपयुक्त वाटत नसल्याचे चित्र आहे.
पुणे महामेट्रोने दापोडी ते पिंपरी मार्गावरील काम पूर्ण केल्याचा दावा केला असला तरी अजूनही या मार्गावर कामे होताना दिसतात. तसेच रात्रीच्या वेळी कामांसाठी ग्रेड सेप्रेटरचा रस्ताही रोखला जातो. मेट्रोने आता ट्रॅकवर धावायला सुरूवात झाली. सुरुवातीच्या काळात मेट्रोबाबत पिंपरी-चिंचवडकरांमध्ये उत्सुकता होती. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, तरुणांनी मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला. मध्यंतरीच्या काळात ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून नेमणूक केलेल्या काही व्यक्तींकडून ढोल ताशा पथक वाद्यांच्या कसरती घेण्यात आल्या. त्यामुळे शहरातील नागरिकांना मेट्रो ही अत्यावश्यक प्रवासी सेवा असल्याचे मान्य नाही.
पिंपरी ते फुगेवाडी मेट्रोचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. अगदीच बोटावर मोजण्याएवढ्या प्रवाशांकडूनच मेट्रोचा उपयोग केला जात आहे. कामावर जाण्यासाठी नागरिकांना मेट्रो सध्यातरी परवडणारी नाही. पुण्यात जाणारे नागरिक पिंपरी ते फुगेवाडी मेट्रोचा प्रवास करून पुढील प्रवास खासगी वाहनाने करणे त्यांना शक्य नाही. फुगेवाडी ते पिंपरी प्रवास करण्याची देखील नागरिकांची तयारी नाही. केवळ पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मेट्रोला पसंती दिली जात आहे. त्यामुळे मेट्रो ही केवळ मनोरंजनाचे साधन बनल्याचे स्पष्ट होत आहे.
स्टेशनच्या नावात बदल
कासारवाडी, नाशिक फाटा येथील मेट्रोच्या स्टेशनला भोसरी मेट्रो स्टेशन असे नाव देण्यात आले होते. भोसरीचा काहीही संबंध नसताना हे नाव दिल्याने सामाजिक कार्यकर्त्यांकडून हा मुद्दा उचलून धरण्यात आला. आक्षेप घेतल्यानंतरही मेट्रोकडून नावात बदल करण्यात आला नव्हता. अखेर रेटा वाढल्याने आजअखेर भोसरी मेट्रो स्टेशन ऐवजी नाशिक फाटा मेट्रो स्टेशन असे नामकरण केले आहे.
सरकता जिना बंद
पिंपरी मेट्रो स्टेशनमधून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आवारात उतरण्यासाठी सरकता जिना तयार करण्यात आला आहे. मात्र, तांत्रिक त्रुटींमुळे सरकता जिना अद्यापही बंद आहे. त्यामुळे महापालिका भवन परिसरातून मेट्रो स्टेशनमध्ये जाण्यासाठी अथवा पालिकेत येण्यासाठी सार्वजनिक जिन्याचा वापर करावा लागत आहे.





