पिंपरी – पूर्णानगर, चिखली परिसरात दहा वर्ष राहणाऱ्या चौधरी कुटूंबाचा हार्डवेअरच्या दुकानात चांगला जम बसला होता. एक दिवसांपूर्वीच ते कुटुंब काश्मीर सहलीवरून परत आले होते. त्यानंतर अवघ्या 24 तासांत म्हणजेच बुधवारी (दि. 30) पहाटे दुकानाला लागलेल्या आगीत संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला. यामुळे चिखली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चिमणाराम बेणाराम चौधरी (वय 48), नम्रता चिमणाराव चौधरी (वय 40), सचिन चिमणाराम चौधरी (वय 13), भावेश चिमणाराम चौधरी (वय 15, सर्व रा. पुजा हाइटस्, पूर्णानगर, चिखली) असे मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. चिमणाराम यांचा हार्डवेअरचा व्यवसाय होता. चार दिवसांपूर्वी हे कुटुंब काश्मीर सहलीला गेले होते. मंगळवारी (दि. 29) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास ते पुन्हा शहरात आले. मंगळवारी त्यांनी पुन्हा दुकान उघडून व्यवसाय सुरू केला.
गेल्या दहा वर्षांपासून ते व्यवसाय करीत होते. तसेच दुकानातील पोटमाळ्यावर त्यांनी राहण्यासाठी घर केले होते. रात्रीच्यावेळी ते दुकानाचा पुढील दरवाजा बाहेरून बंद करीत होते व बाजूला असलेले शटर आतून बंद करीत होते. बुधवारी पहाटे 5.25 वाजताच्या सुमारास दुकानाला आग लागल्याची वर्दी पूजा हाइटस्मधील रहिवाशांनी अग्निशामक दलाला दिली. त्यानुसार चिखली अग्निशामक दलाचा बंब अवघ्या पाच मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाला. दुकानात चारजण अडकले असल्याची माहिती त्यांनी अग्निशामक मुख्यालयास दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशामक दलाचे दहा बंब, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.
आगीने संपूर्ण दुकानाला वेढले होते. आगीमुळे दुकानाचे शटर पूर्ण लाल झाले होते. त्यामुळे शटर उचकटण्यात अग्निशामक दलास अडचण येत होती. अखेर साखळीचा हुक शटरला अडकवून गाडीने ओढल्यानंतर शटर उचकटले. टर्पेटाईल, थिनेल आणि रंगाचे डबे यांनी पेट घेतल्याचे दिसून आले. दीड तासांत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत आतील चारही जणांचा मृत्यू झाला होता.
त्यांनी वाचण्याचे प्रयत्न केलेही पण…
दुकानात अगदी शेवटी पोटमाळ्यावर जाण्यासाठी जिना होता. जिन्यावरून उतरून चिमणाराम हे बाहेर जाण्यासाठी असलेल्या जिन्याजवळ मृत अवस्थेत मिळून आले. तर त्यांची पत्नी नम्रता ह्या दुकानात आतून लावलेल्या कुलूपाच्या चावीजवळ मिळून आल्या. भावेश हा मुलगा पोटमाळ्यावरून खाली आल्याचे आढळून आले. त्यांनी बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधार, धूर आणि आग यामुळे त्यांना आपली सुटका करता आली नसल्याचे घटनास्थळावरून दिसून आले. तर लहानग्या सचिनचा मृतदेह पोटमाळ्यावर आढळून आला.