पिंपरी – सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळावी यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि पीएमपीएमएल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील प्रमुख रस्त्यांवर बीआरटी मार्ग उभारण्यात आले आहेत. मात्र या मार्गामध्ये हजारोंच्या संख्येने खासगी वाहन चालक घुसखोरी करतात. अधून-मधून वाहतूक पोलीस अशा वाहनचालकांवर कारवाई करतात. गेल्या आठ महिन्यांमध्ये अशा 44 हजार 986 वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करीत तब्बल तीन कोटी 10 लाख 41 हजारांचा दंड केला आहे. तरी देखील बीआरटी मार्गात खासगी वाहनांची घुसखोरी सुरूच आहे. रस्त्यावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. वाढत्या वाहन संख्येला आटोक्यात ठेवायचे असल्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे हाच त्यावरील उपाय आहे. त्यामुळे बसचा जलद गतीने प्रवास व्हावा यासाठी बीआरटी मार्ग राखीव ठेवण्यात आले आहेत. या मार्गातून पीएमपीएमएलच्या बस शिवाय इतर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याबाबतचा अंतिम आदेश पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी 31 ऑगस्ट 2023 रोजी काढले आहेत. मात्र यापूर्वीच प्रायोगिक तत्वावर इतर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाची अमलबजावणी वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये वाहतूक पोलिसांनी तब्बल 44 हजार 986 खासगी वाहनांवर कारवाई करीत त्यांना तीन कोटी 10 लाख 41 हजारांचा दंड केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होऊन देखील वाहन चालकांचा बेशिस्तपणा कमी झालेला नाही. अजूनही बीआरटी मार्गात घुसखोरी सुरूच आहे. बीआरटी मार्गात बस शिवाय अग्निशामक दल, रूग्णवाहिका आणि पोलीस वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांवर निर्बंध असल्याचे आदेश पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी काढले आहेत. बीआरटी मार्गातील बसला अडथळा इतर वाहन चालकांसाठी व बीआरटी मार्गातील बसकरिता वेगवेगळे सिग्नल देण्यात आले आहेत. मात्र इतर वाहनांनी बीआरटी मार्गात घुसखोरी केल्यावर आणि चौकातील बीआरटीचा सिग्नल सुरू झाल्यावरही घुसखोरी केलेली वाहने पुढे जात नाहीत. त्यामुळे बसला पुढचा सिग्नल मिळेपर्यंत चौकातच थांबावे लागते. बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. तसेच 1 सप्टेंबर पासून वाहतूक पोलिसांनी बीआरटी मार्गातील खासगी वाहनांवर कारवाईसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. तसेच दंडाची रक्कमही वाढविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे. तसेच बीआरटी मार्गात वाहने आणू नये. – विठ्ठल कुबडे, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग महिना केसेस दंड जानेवारी 4,532 29,45,500 फेब्रुवारी 7,426 46,18,500 मार्च 6,739 44,20,500 एप्रिल 5,878 40,34,500 मे 5,182 36,66,000 जून 4,986 36,23,500 जुलै 4,666 35,01,000 ऑगस्ट 5577 42,31,500 ———————————- एकूण 44,986 3,10,41,000