पिंपरी-चिंचवड : कचरा वाहनांच्या दुरवस्थेमुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय

पिंपळे गुरव – दापोडी येथे कचरा संकलन करणाऱ्या दुचाकी गाडीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करून गाडीत भरलेला कचरा पुन्हा त्याच परिसरात पडत असल्याने कर्मचारी त्रस्त आहेत. महापालिका प्रशासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांना ढकल गाडी दिली आहे. सध्या त्या बिकट अवस्थेत आहेत. त्यामुळे प्रशासनाने नवीन गाड्या द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
दापोडी परिसरात स्वच्छता कर्मचारी रस्त्याची व परिसराची स्वच्छता करून करचरा हातगाडीमध्ये भरतात. परंतु तोच कचरा गाडीची दुरवस्था झाल्याने वाहतूक करताना रस्त्यात पडत आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्त्याच्या बाजूला असलेले व्यावसायिक व घरमालक स्वच्छता कर्मचारी यांच्यात वाद होत आहे. कचरा गाडीचा पत्रा तुटलेला तर कुठे चाक खराब झाले आहे. त्यामुळे नागरिकांबरोबरच कर्मचारी देखील वैतागले आहेत.
स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनांचा अभाव असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने येथील कर्मचाऱ्यांना नवीन हातगाड्या व सुरक्षा साधने पुरवावित, असे महापालिक कर्मचारी संदीप राठोड यांनी मागणी केली आहे.
आम्ही हातगाड्या दुरुस्तीसाठी दिल्या आहेत. त्या लवकरच येतील. तसेच कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने उपलब्ध करून दिले जातील.
– रमेश भोसले, सहायक आरोग्य अधिकारी “ह’ प्रभाग





